कोरोनाने जगात धुमाकूळ घातल्याने जशी अर्थव्यवस्था कुंठीत झाली आहे, तसेच क्रीड जगतही ठप्प झाले आहे. भारतीयांचा आत्मा असलेल्या क्रिकेटचे सामने होणार किंवा नाही, अशी भीती लोकांना वाटू लागली आहे. परंतु, जनता कितीही क्रिकेटच्या प्रेमात असली, तरी कोरोनाचा धोका सर्वात मोठा आहे, त्यामुळे हे सामने सध्या तरी पुढे ढकलणे कदाचित वाटल्यास रद्द करण्याची वेळ आली तरी कुणी वाईट वाटून घेऊ नये, अशी स्थिती आहे. बीसीसीआयच्या कार्यालयातील बहुतांशी कर्मचारीही आता घरुन काम करु लागले आहेत. यंदाच्या 13व्या सत्रातील आयपीएल स्पर्धेच्या आयोजनाबाबत आठही फ्रँचायझी आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी विविध पर्यायदेखील सुचवले आहेत. मात्र, अद्याप याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आली नाही. आयपीएलच्या फ्रँचायझींनी विदेशी खेळाडूंना भारतामध्ये दाखल होण्यासाठीची परवानगी मागितली आहे. त्यामुळे व्हिसा दिल्यास आम्ही 14 दिवसांत या सर्व विदेशी खेळाडूंच्या विलगीकरणासाठी तयार असल्याचेही स्पष्ट केले. मात्र, या मागणीवर अद्याप बीसीसीआयने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळेच अद्यापही आयपीएलच्या आयोजनावरची टांगती तलवार कायम आहे. मात्र, सध्याची स्थिती पाहता ही स्पर्धा पुढे ढकलणे किंवा वाटल्यास रद्द करणेच शहाणपणाचे ठरेल. यासंदर्भात सर्व फ्रँचायझींनी स्पर्धा आयोजनाचा आग्रह धरु नये. आयपीएल स्पर्धेतील आपल्या खेळाडूंच्या सहभागाबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रीया दिली नाही. सध्या या व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वतीने आपल्या खेळाडूंना लीगमधील सहभागासाठी मनाई केली जाण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या संघाचा सलामीवीर अ‍ॅलेक्स हेल्समध्ये कोरोना आजाराची काही लक्षणे आढळली आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे इंग्लडची काऊंटी क्रिकेटही प्रभावित होत आहे. सरे काऊंटीच्या सहा खेळाडूंना विलगीकरणामध्ये राहायला सांगितले आहे. पाकिस्तान सुपर लीग खेळणारे इंग्लडचे खेळाडू जेसन रॉय लंडनला परतले. तर ऑस्ट्रेलियातील क्रिकेट चॅम्पियनशिप शेफील्ड शिल्ड टूर्नामेंट बंद करण्यात आली. या दोन्ही देशांमध्ये 2 एप्रिलपासून तीन टी-20 आणि तीन वन-डे सामने होणार होते. काऊंटी क्रिकेट चॅम्पियनशिप रद्द करण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरूद्ध तीन सामन्यांची वन-डे मालिका अर्ध्यातच रद्द केली होती. पाकिस्तान सुपर लीगमध्ये इंग्लंडचे सहा खेळाडू वेगवेगळ्या फ्रेंचाइजीसमध्ये होते. हे सर्व खेळाडू आपल्या देशाला रवाना झाले. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानेही देशातील सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. क्रीडा जगतासाठी सर्वात धक्कादायक बातमी म्हणजे, स्पेनिश फुटबॉल क्लब अ‍ॅटलेटिको पोरडाटाचे कोच फ्रांसिस्को ग्रेसिया यांचे कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे निधन झाले. ग्रेसिया अ‍ॅटलेटिकोच्या यूथ टीमचे हेड कोच होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते. कोरोना व्हायरस सध्या जगात धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे जगाच्या कानाकोपर्‍यात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचाच मोठा परिणाम सर्वच क्षेत्रांवर होत आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रे अडचणीत सापडली आहेेत. यामध्ये क्रीडा क्षेत्राचाही समावेश आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या स्पर्धांचे आयोजन रद्द करण्यात आले. याशिवाय सध्या ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजनही अडचणीत सापडले आहे. या व्हायरसच्या भीतीमुळे ही भयावह परिस्थिती निर्माण झाली. यामुळेच अमेरिकेतील 11.85 लाख कोटींच्या स्पोर्ट्स बाजारपेठेला मोठा फटका बसला. याबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या क्रीडा विश्‍वच अडचणीत सापडले आहे. यातून आता 160 कोटी दशलक्ष डॉलरचे मार्केट अडचणीत सापडले आहे. यामध्ये बास्केटबॉल, बेसबॉल, हॉकी, कॉलेज बास्केटबॉल, टेनिस, गोल्फ यासारख्या विविध खेळ प्रकारातील स्पर्धांचा समावेश आहे. याच व्हायरसमुळे खेळाडूंनाही मोठी झळ बसत आहे. अमेरिकी बास्केटबॉल लीग एन.बी.ए.ला याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. कारण, याचे या सत्रातील सामने स्थगित झाले. त्यामुळे या सामन्यांच्या प्रक्षेपणासाठी करण्यात आलेला सर्वात मोठा 33 हजार कोटींचा प्रक्षेपणासाठीचा करार अडचणीत सापडला आहे. यातून एन.बी.ए.ला 67 हजार कोटी मिळणार होते. आता ही सर्वात मोठी झळ अनेक वाहिन्यांना सोसावी लागणार आहे. याचा परिणाम खेळाडूंच्या करारावर होईल. अमेरिकेत नॅशनल हॉकी लीगला मोठा चाहता वर्ग आहे. आता या स्पर्धेच्या रद्दमुळे हे अडचणीत सापडले आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील टेनिस आणि गोल्फ स्पर्धेच्या आयोजनालाही मोठा फटका बसला. यामुळे या स्पर्धेचे आयोजन रद्द झाले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी देणगी जमा केली जाते. त्याचा वापर इतर कार्यासाठी केला जातो. आता या स्पर्धा रद्द झाल्याने सामाजिक संस्थांना देणगी मिळणार नाही. त्यामुळे दरवर्षीय यातून 1500 कोटी रुपये जमा होत होते. आता ही रक्कम जमा होणे अशक्य आहे. आता याच पार्श्‍वभूमीवर आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनावरही टांगती तलवार आहे. जपानमधील 45 टक्के चाहत्यांनी ही स्पर्धा लांबणीवर टाकण्याला पसंती दर्शवली. तसेच 70 टक्के चाहत्यांनी आताच्या निश्‍चित वेळापत्रकानुसार आयोजन करणे अडचणीत आणि संकटात सापडू शकेल, असा सल्लाही दिला. जपानमध्ये 24 जुलैपासून ही स्पर्धा होईल. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीही आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन लांबणीवर टाकण्याला पाठिंबा दर्शवला आहे. एकूणच क्रीडा जगतही अर्थव्यवस्थेप्रमाणे ठप्प झाले आहे.

 

अवश्य वाचा

भाजपचे यश ः शोध आणि बोध