कदाचित आज त्याचे नावही ऐकले नसते. तो कोठेतरी लांब समुद्राच्या मध्यभागी मासे पकडायला गेला असता तर  जगाने दखल घ्यावे असे कोणते कर्तृत्व त्या मच्छिमाराच्या हातून झाले असते? म्हणजे, त्याचे असे घडले, की त्याच्या जन्माच्या वेळी त्याची हॉस्पिटलमध्ये झालेली अदलाबदल त्याच्या आईला भेटायला आलेल्या नानाकाकांच्या लक्षात आली. कारण, जन्मतःच त्याच्या डाव्या कानावर असलेली खूण त्यांनी पाहिली होती. शोधाशोध केली तेव्हा हे तान्हुले एका कोळीणीच्या कुशीत छान खेळत होते. एखाद्या हिंदी चित्रपटात घडावी अशीच घटना त्यांच्या बाबतीत घडली. त्याचे नाव विक्रमादित्य लिटल मास्टर सुनील गावस्कर. 10 जुलै त्याचा हा जन्मदिन. 

तसे पाहिले तर लहानपणी त्याचा ओढा हा कुस्तीकडे होता. वयाच्या 19व्या वर्षी क्रिकेट खेळायला त्याने खर्‍या अर्थाने सुरुवात केली. शाळा, महाविद्यालयात शतकी, द्विशतकी खेळीने रणजीचे दरवाजे त्याच्यासाठी आपोआप उघडले. रणजित धावांचा पाऊस पाडून त्याने प्रेक्षकांना इतके भिजवले की, त्याची दखल निवड समितीला घ्यायलाच लागली. इ.स. 1970-71च्या सुमारास सुनीलची निवड वेस्ट इंडिजच्या दौर्‍यासाठी झाली. त्या काळी विंडीजचे बॉलर म्हणजे तोफखानाच. सुनीलने आपल्या बॅटने त्या तोफा निकामी केल्या. चार सामन्यांत 154च्या सरासरीने त्याने 447 धावा फटकावल्या. आणि, कहर म्हणजे शेवटच्या कसोटीत भारताची अवस्था अतिशय बिकट होती. पहिल्या डावात 166 धावांची आघाडी विंडीजने घेतल्यावर दुसर्‍या डावात सुनीलने 220 फटकावून भारताची लाज राखली. 1978ला विंडीजचा संघ भारतात आला होता. भारताची एक बाद 17 अशी बिकट अवस्था असताना गावस्कर मैदानात उतरला. वेंगसरकरच्या साथीने त्याने नाबाद 189 धावा फटकावून डाव घोषित केला आणि विंडीजला खेळण्याचे आव्हान दिले. नऊ बाद 197 अशी बिकट अवस्था विंडीजला होती. अपुर्‍या प्रकाशामुळे खेळ थांबला आणि विंडीज वाचला. संघहित महत्त्वाचे हे तत्त्व सुनीलने आयुष्यभर जोपासले. आपल्या द्विशतकाच्या मागे तो लागला नाही आणि विशेष म्हणजे तो स्वतः कप्तान होता. सुनीलने भारतीय संघाला एक स्वप्न दाखवले ते जिंकायचे. सुनील येण्यापूर्वी भारतीय क्रिकेटचा इतिहास हा हरायचाच होता. विजयाची चटक भारतीय संघाला सुनीलने लावली 1970 ते 1987 या दोन दशकांच्या कालखंडात. भारतीय संघ वजा सुनील गावस्कर = 0 असे परदेशातील लोक बोलत असत. 

आज क्रिकेट हा खेळ रस्त्यावर चायनीज फूडप्रमाणे फास्ट झाला आहे. सुनीलचे बरेच रेकॉर्ड आज तुटले आहेत. पण, त्याने ज्या काळात आणि ज्या परिस्थितीत हे विक्रम केले होते, ते पाहता त्या वेळेस हे फक्त सुनीलच करू शकत होता. 29 शतकांच्या ब्रँडमनचा कित्येक वर्षे अबाधित असणारा रेकॉर्ड त्याने मोडला. 10,000च्या वर धावा फटकावणारा तो पहिलाच खेळाडू. 125 कसोटीचे एव्हरेस्ट शिखर गाठणारा तो पहिलाच वीर. सर्वाधिक 45 अर्धशतके ठोकणारा तो पहिलाच सरदार. दोन्ही वेळा शतके ठोकण्याची किमया त्याच्याच नावावर. काही चमत्कारिक रेकॉर्ड्ससुद्धा त्याच्या नावावर आहेत. ओळीने नऊ वेळा टॉस हरणारा हाच सुनील. पहिल्याच चेंडूवर तीन वेळा बाद  होणारा तो एकमेव आणि वन-डेमध्ये प्रथम फलंदाजीला येऊन व अखेरपर्यंत नाबाद राहून 36 धावा काढणाराही सुनीलच. तथापि, एखादा हुशार विद्यार्थी आजारातून बरा होऊन चटकन आवरून पटकन यश मिळवतो, तसाच सुनीलचा वन-डे क्रिकेटचा इतिहास आहे. 

लवकरच त्याने एकदिवसीय सामन्यांचे तंत्र आत्मसात केले आणि न्यूझीलंडविरुद्ध नाबाद 103 धावांची झकास खेळी केली. नाबाद 36 ते नाबाद 103 असा त्याचा वन-डेचा प्रवास आहे. सुनील म्हणजे, क्रिकेटचा अलंकार, असे दस्तुरखुद्द ब्रँडमननी त्याच्याबाबत उद्गार काढले. भारतीय क्रिकेटला वैभवाच्या शिखरावर नेऊन पोहोचविणार्‍या सुनीलला 125 वर्षांचे उदंड आयुष्य लाभो, हीच शुभेच्छा!

अवश्य वाचा

मुरूड - अलिबाग बस नादुरुस्त...