ठराविक काळानंतर नियमितपणे एकाच ठिकाणी भेट देण्याच्या कृती म्हणजे ‘वारी’. वारी हा आपल्या नेहमीच्या वापरातला शब्द आहे. मात्र, बोलीभाषेतल्या इतक्या सहजतेने उच्चारल्या आणि वापरल्या जाणार्‍या शब्दाला भक्ती आणि श्रद्धेचे फार सुरेख कोंदण आहे. म्हणूनच वारी हा शब्द लिहिण्यात, बोलण्यात अथवा वाचनात आला तरी पंढरीच्या दिशेने निघालेला तो भक्तीसागर नजरेसमोर तरळून जातो. सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस असणारे हजारो भक्तगण त्याच्या नामाचा गजर करत पुढे पावले टाकतात आणि येणार्‍या प्रत्येक अडचणीवर मात करत चालत राहतात, तेव्हाच या नावात किती मोठी शक्ती आहे याचे प्रत्यंतर येते. कुटुंबातल्या सदस्यांनी एकत्रित नियोजन करुन एखादा बेत ठरवला तरी तो यशस्वीरित्या पूर्ण करताना अनंत अडचणी येतात. पण, इथे नात्याचे ना गोत्याचे असणारे असंख्य अपरिचित एकत्र येतात आणि एकमेकांना ‘माऊली’ अशी प्रेमळ साद घालत, साह्य करत, एकमेकांबरोबरचे सहजीवन अनुभवत पंढरीपर्यंतचे अंतर पार करतात, तेव्हा त्यांना एकत्र गुंफून ठेवणारा हा धागा किती बळकट आहे याची खात्री पटते. 

वारी म्हणजे विश्‍वास आहे तशीच आस आहे, वारी म्हणजे भक्ती आहे आणि शारीरिक व मानसिक शक्ती आहे, वारी म्हणजे निष्ठा आहे आणि प्रयत्नांची पराकाष्ठा आहे. खरं तर, वारीमध्ये चालणारा हा वर्ग अतिशय सामान्य आहे. नियतीकडून त्याला ‘छप्पर फाडके’ असे काही मिळालेले नाही आणि आयुष्याकडून फार काही वेगळे मिळण्याची त्याची अपेक्षाही नाही. गावखेड्यात, उपनगरांमध्ये, जेमतेम स्थितीत राहणार्‍या या लोकांना आहे त्या स्थितीत समाधानी राहण्याचे कसब अवगत आहे. 

कदाचित त्यामुळेच कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता संतमहात्म्यांच्या पादुका नाचवत, मिरवत हा जत्था निरपेक्ष भावनेने पंढरीच्या वेशीपर्यंत मजल मारु शकतो. त्यांच्या मनातली भक्ती इतकी उत्कट आहे की डोळ्याला विठूरायाची मूर्ती दिसली नाही तरी ते मंदिराच्या शिखरावरच त्याची सावळी प्रतिमा पाहू शकतात. ते निर्गुण, निराकार रुप जणू त्यांना सर्वत्र, सर्वांठायी दिसते. म्हणूनच एकमेकांच्या पाया पडताना वयाचे, जातीपातीचे, धर्माचे, शिक्षणाचे असे कोणतेही निकष त्यांच्यापुढे राहात नाहीत. कमालीची शिस्त पाळत, स्वानंदात मग्न होत, भजन-कीर्तनादी कार्यक्रमामध्ये दंग होत आणि आता तर सामाजिक जाणीव आणि पर्यावरणाचे भान राखत ही वारी पूर्णत्वास जाते. वर्षानुवर्षांची ही परंपरा राखत प्रत्येक जण त्यात सहभागी होत राहतो. एक पिढी थकली की नवी पिढी नव्या जाणिवांनिशी त्यांची जागा घेते आणि अशा प्रकारे एक-एक धागा मिसळत भक्तीचे हे बंध अतूट, अभंग राहतात.

आताही सगळीकडे वारीची चर्चा आहे. ज्ञानोबा, तुकोबादी संतांच्या पालख्यांसवे हजारो दिंड्या पंढरीच्या दिशेने प्रवास करत आहेत. याचा इतिहासही जाणून घेण्याजोगा आहे. माऊलीच्या पालखीचे मूळ सत्पुरुष हैबतबाबा आरफळकर यांच्या सेवेतून हे सर्व आले. ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरीच्या सेनाधिकार्‍यांनी माऊलीचा कृपाप्रसाद झाला म्हणून ज्ञानदेवांच्या पादुका डोक्यावर घेऊन पंढरीच्या वारीला जाण्याची प्रथा सुरू केली. त्यानंतर बेळगाव-अंकलीचे सरदार शितोळे यांनी या कार्याला पालखी, घोडे, तंबू, अबदागिरी, माऊलीच्या मुक्कामासाठी शामियाना अशा गोष्टी देऊन याला सोहळ्याचे रुप दिले. वासकरांच्या फडातून टाळकर्‍यांची पहिली दिंडी तयार झाली. नंतरच्या काळात हे स्वरुप अफाट झाले. 

माऊलीच्या रथापुढे सुमारे दीड-दोन लाख वारकरी, पालखीपुढे सव्वीस तर मागे सुमारे दीडशे नोंदवलेल्या दिंड्या आणि त्यामागे नोंदणी नसलेल्या अनेक दिंड्या, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या भाविक महिला, त्यामागे मुक्कामाची सोय असणारे सामानाचे ट्रक असे वैभवी आणि प्रचंड स्वरुप या सोहळ्याला प्राप्त झाले. देवस्थानचे विश्‍वस्त, चोपदार, पुजारी  आदी मंडळी व्यवस्थापनात सेवा देत राहिली.

संत तुकारामांच्या परंपरेप्रमाणे इ.स. 1685 मध्ये त्यांच्या चिरंजीवांनी म्हणजे नारायण महाराजांनी ज्ञानोबा- तुकारामाच्या पादुका पालखीतून पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरु केली. पुढे त्यांची व्यवस्था वेगळी झाली. माऊलीप्रमाणेच संत तुकारामांच्या पालखी सोहळ्यातही अनेक दिंड्या सहभागी झाल्या. त्यात विविध फडांचाही सहभाग आहे. या पालख्या वेगळ्या मार्गाने पंढरपूरकडे रवाना होतात. पंढरपूरपासून वीस किलोमीटर अंतरावर वाखरी गावी सद्गुरु सीताराम महाराजांचे समाधीस्थान आहे. या ठिकाणी आषाढ शुद्ध नवमीला सर्व संतांच्या पालख्या एकत्र येतात. दशमीला सायंकाळी पंढरपूरमध्ये प्रवेश करतात. संत नामदेवरायाची पालखी सर्व संतांचे स्वागत करण्यासाठी पंढरपूरमधून वाखरीला सामोरी येते. वाखरीला निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, एकनाथ, चोखोबा, गोरोबा, सावतोबा आदी संतांच्या पालख्या हजर होतात. माऊलीची पालखी आळंदी-पुणे-सासवड-जेजुरी-वाल्हे-लोणंद- तरडगाव-फलटण-बरड-नातेपुते-माळशिरस- वेळापूर- भंडीशेगाव-वाखरीमार्गे दशमीला रात्री पंढरपूरमध्ये दाखल होते, तर तुकोबाची देहू-आकुर्डी-पुणे-लोणी काळभोर-यवत-वरवंड- उंडवडी-बारामती-सणसर-निमगाव-इंदापूर-सराटी-अकलूज-घोरगाव-कुरोली-वाखरीमार्गे पंढरपूरमध्ये दाखल होते. सुमारे सव्वादोनशे किलोमीटरची चाल, टाळ-मृदंगाच्या, विठ्ठलनामाच्या गजरात वारकरी शिस्तबद्ध चालत असतो. महान समूहातील एक कण बनून, स्वत:चं व्यक्तिमत्त्व विसरुन तो विठ्ठलभेटीसाठी वाटचाल करत असतो. मार्गामध्ये राहण्याच्या सोयीचा, स्नान-प्रातर्विधीच्या प्राथमिक सोयींचा अभाव या आणि अशा सर्व गैरसोयींसह वारकरी मार्ग क्रमत असतो, तोही समाधानात... 

महाराष्ट्रात ‘वारकरी’ नावाची एक जमात असते. त्यामध्ये अनेक समाजाचे स्त्री-पुरुष सामावलेले असतात. महिला मुक्कामावर पोळ्या-भाकरी करतात तर गडी माणसे आमटी-भाज्यांची भांडी चुलीवर चढवतात, उतरवतात. पंक्तींमध्ये वाढायचे काम आणि भोजनोत्तर पत्रावळी उचलण्याचे कामही पुरुषमंडळी करतात. घरी चहाचा कपही हातात द्यावा अशी अपेक्षा करणारे लोक इथे पडतील ती सगळी कामे हसत-हसत करतात. हाती टाळ, गळा तुळशीमाळ, कपाळी बुक्याचा टिळा अशा रुपातला वारकरी विठोबाचा सैनिक वाटतो. विडी-काडी, बाटली, तंबाखू कशाचीही सोबत नाही. घरी ही व्यसने करत असला तरी दिंडीत ते कटाक्षाने वर्ज्य करतात. इथे स्त्री-पुरुष भेद नाही. कष्टाची सामुदायिक जबाबदारी उचलली जाते. महिलादेखील दिंडीत टाळ वाजवतात. या सगळ्याच बाबी अद्भूत वाटतात. मुक्कामावर समाज आरतीमध्ये विश्‍वस्तांमार्फत दिंड्यामधील तक्रारी, अडचणी, गैरसोयी, बेशिस्ती याची सोडवणूक होते. या प्रवासात पोलीस क्वचितच दिसतात. समाज व्यसनाधीन आहे, मांसाहार नित्याहार झाला आहे, पान-तंबाखू-विडी-काडी तर कधी चपटी बाटली हे खेड्यात सर्वत्र आढळते. पण, तेच खेडूत दिंडीत वावरताना या सर्वांपासून अलिप्त असतात. एरवी छोट्या कुरबुरी झाल्या तरी पोलीस केस करणारे इथे मात्र गुण्यागोविंदाने नांदताना दिसतात. 

एकदा न्यायमूर्ती माधवराव रानडे यांनी बुधवार पेठेतील प्रार्थना समाजाच्या हरिमंदिराजवळून पालखी जाताना पाहिली. हजारो वारकर्‍यांना देहभान विसरुन टाळ-मृदुंगाच्या तालावर नाचताना पाहिले त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. त्यांनी पालखी सोहळ्याविषयी आणखी माहिती मिळवून त्यावर प्रार्थना समाजात व्याख्यान दिले. प्रार्थना समाजाचे अनुयायी वारकरी नसले, मूर्तीपूजक नसले तरी हे व्याख्यान झाले. इतके लाखो वारकरी दरवर्षी सामूहिक स्वरुपात ईश्‍वरभक्ती करतात, हा आदर्श आपणही घ्यायला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. त्यांचा हा उपदेश आपल्या सर्वांनाच लागू होतो.

 

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास