कोरोना विषाणूने सध्या जगभरात थैमान घातले आहे. विज्ञानाच्या सहाय्याने संशोधन करुन असाध्य गोष्टींवर मात करणार्‍या मानवाला ही साथ आटोक्यात आणणे कठीण जात आहे. परंतु, ज्या चीनमधील हुवान प्रांतामध्ये कोरोनाची पहिली लागण झाली, तेथे मात्र हा संसर्ग पूर्णपणे अटोक्यात आला आहे. चिनी डॉक्टर व प्रशासनाने यात बहुतांशी यश संपादन केले आहे. मात्र, चीनमधील अजूनही अन्य भागात ही साथ हुवानसारखी आटोक्यात आलेली नाही. सध्याची ही चीनची साथ आटोक्यात आणण्याची प्रगती पाहता, येत्या दोन-तीन महिन्यांत ते यावर पूर्णपणे ताबा मिळवतील. आता ही साथ झपाट्याने युरोपात पसरत आहे. त्यामुळे युरोप, इराण, कोरिया या देशांत धोका वाढत चालला आहे. युरोपातील इटली या पर्यटकांच्या माहेरघरात या साथीने पहिला शिरकाव केला आणि आता स्थिती आटोक्याच्या बाहेर गेली आहे. युरोपात आलेले पर्यटक व जगात फिरुन आलेले युरोपीयन नागरिक यांच्यामुळे ही साथ तेथे पोहोचली. आपल्याकडे भारतातही ही साथ मर्यादित राहिली असती. सुरुवातीपासून केंद्र सरकारने जर खबरदारीचे उपाय, प्रामुख्याने विदेशी पर्यटक व आपले विदेशात जाऊन आलेले नागरिक यांच्यावर लक्ष ठेवून कार्यवाही केली असती, तर सध्याची स्थिती उद्भवली नसती. जगातील अन्य भागातून आलेल्या पर्यटकांवर लक्ष ठेवण्यात आले, मात्र दुबईला वगळण्यात आले. नेमके दुबईतून आलेले पुण्याचे पर्यटकच ही साथ घेऊन आले. जर त्यावेळी त्यांची तपासणी केली असती, तर सध्याची लागण झालेल्यांची संख्या वाढली नसती. आता मात्र राज्य सरकारने कडेकोट बंदोबस्त केला आहे. तसेच सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणांवर बंदीच घातली आहे. सर्वात धोकादायक स्थिती आहे ती अफवा पसरविणे व खोट्या माहितीच्या आधारावर अफवाजन्य असलेल्या बातम्या रंगवून प्रसारित करणे. नेहमीप्रमाणे चॅनेल्सनी या बातम्या रंगवून देऊन सर्वात प्रथम बातमी देण्याचा सुरु केलेला आटापिटा. यात ते बातम्यांची सत्यता पटवून देण्याची तसदी घेत नाहीत. यातून लोकांमध्ये जास्तच घबराट निर्माण होते. आपण जी जनतेला बातमी देत आहोत, ती आपला टी.आर.पी. जास्त व्हावा यासाठी देतो, अशी त्यांची ठाम समजूत झालेली आहे. खरे तर, बातमी ही जनतेच्या भल्यासाठी देतो, लवकर घाईत दिलेली बातमी खोटी ठरल्यास त्याचे किती विपरित परिणाम होऊ शकतात, याचा यत्किंचितही विचार केला जात नाही, ही दुर्दैवी बाब आहे. तसेच सोशल मीडियावरही अनेकदा खोटे मेसेज प्रसारित केले जातात. यातून लोकांमध्ये विनाकारण घबराट निर्माण होते. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ या डॉक्टरांच्या अधिकृत संघटनेने जनजागृती करण्यासाठी एक माहिती पत्रक जारी केलेले आहे. ही माहिती जनतेला प्रसारित करण्याऐवजी कोरोनावर गोमूत्र कसे फायदेशीर आहे, हा रोग कोंबडी खाल्ल्याने होतो, असे अनेक खोटे मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर प्रसारित केले जातात. रामदेवबाबांचा कोणता धूप केल्याने कोरोना पळतो, याचा तासन्तास कार्यक्रम एक चॅनेल दाखवित होते. अशा प्रकारे जनतेची दिशाभूलच केली जाते. या माध्यमांवर खरे तर तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. अलिबागमध्येदेखील अशा अनेक अफवांचे पीक आले आहे. अशा प्रकारे जनतेची दिशाभूल करणार्‍यांच्या विरोधात सरकारने कडक पावले उचलण्याची आवश्यकता आहे. कारण, हेच लोक देशाचे नुकसान करीत आहेत. लाखो लोकांचा रोजगार असलेला पोल्ट्री उद्योग याच अफवांमुळे आज डबघाईला आला आहे. सध्या बहुतांशी लोक घरी बसलेले आहेत. त्यामुळे या रिकाम्या डोक्याला योग्य मार्गदर्शन न केल्यास यातून देशात विघातक स्थिती निर्माण होऊ शकते. ही जबाबदारी केवळ वृत्तपत्रांची नाही, तर टीव्ही चॅनेल्सची व सोशल मीडियाची जास्त आहे. कारण, त्यांच्यावर एक जबरदस्त प्रभाव टाकणारे माध्यम म्हणून सध्या पाहिले जाते. सध्या जी जागतिक पातळीवर घबराट आहे, त्यात भर घालण्याचे नाही, तर ती कमी करण्याचे काम आहे, हे प्रसारमाध्यमांनी जाणले पाहिजे व त्या दृष्टीने जबाबदारीने काम केले पाहिजे. जागतिक पातळीवर सध्या उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. अशा स्थितीत जगातील शेअर बाजार दररोज कोसळत आहेत. मुंबई शेअर बाजारही त्याला काही अपवाद नाही. गेले काही दिवस मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स गेल्या काही दिवसांत तब्बल 25 टक्क्यांहून जास्त कोसळला आहे. शेअर बाजारातील घसरण ही रोजचीच झाली आहे. अर्थात, जगातील ही स्थिती आहे. अर्थात, ही स्थिती नजीकच्या काळात काही सुधारेल असे दिसत नाही. शेअर बाजारातील घसरण ही जागतिक घबराटीपोटी आहे. जोपर्यंत ही साथ आटोक्यात येत नाही, तोपर्यंत ही घसरण अशीच सुरु राहील. आता साथ आटोक्यात आल्यावर चीन आपल्या चलनाचे अवमूल्यन करुन निर्यात वाढविण्याचा आटोकाट प्रयत्न करील. त्या स्पर्धेत आपल्याला टिकाव धरणे कठीण जाणार, हे नक्की आहे. आपल्याकडे रुपयाचे गेल्या काही दिवसांत झपाट्याने अवमूल्यन झाले आहे, ते रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने चलन बाजारात हस्तक्षेप करण्यास प्रारंभ केला आहे. परंतु, या स्थितीत कितपत सुधारणा होईल, हे आत्ताच सांगता येत नाही. कारण, सध्या जागतिक पातळीवरच संकट आहे.

 

अवश्य वाचा

माथेरानच्या पायथ्याशी वणवा