अलिबाग  

अलिबाग तालुक्यातील रेवस बंदराकडे जाणार्या  मार्गावरील प्रलंबित बागदांडा ते रेवस बंदर हा रस्ता लवकरच सिमेंट काँक्रिटने तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारा निधी विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील आणि माजी आमदार पंडित पाटील यांच्या प्रयत्नांतून मंजूर झाला असल्याची माहिती या रस्त्यासाठी सतत पाठपुरावा करणारे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी दिली आहे.

रेवस बंदर हे तालुक्यातील सर्वात जुने प्रवाशी बंदर आहे. दुर्लक्षित राहिलेल्या या बंदराकडे जाणारा रस्ताही परिणामी खड्ड्यात गेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या कात्रीत सापडलेल्या या रस्त्याला कात्रीतून सोडविण्यासाठी सभापती दिलीप भोईर यांनी आ.जयंत पाटील आणि माजी आमदार पंडित पाटील यांच्याकडे नेहमीच मागणी केली. दररोज शेकडो वाहनांची होणारी वाहतूक, खड्ड्यांच्या रस्त्यांमुळे होणारा त्रास याचे गांभीर्य ओळखून श्री. भोईर यांनी पाठपुरावा सुरू ठेवला.

अलिबाग ते सारळ या रस्त्याच्या डांबरीकरणासाठीही दिलीप भोईर यांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आणि आज हा रस्ता सुसज्ज आणि मजबूत झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. मात्र बागदांडा ते रेवस बंदर या मार्गावर वाहनचालकांना कसरत करावी लागते. प्रवाशांनाही अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत विक्रम-मिनिडोअर संघटनेच्या वतीने दिलीप भोईर यांच्याकडे कैफियत मांडण्यात आली. जिल्हा परिषदेचे सदस्य आणि संघटनेचे अध्यक्ष या नात्याने दिलीप भोईर यांनी हा रस्ता होण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले.

अखेर आ.जयंत पाटील आणि माजी आमदार पंडीत पाटील यांच्या प्रयत्नांतून बागदांडा ते रेवस बंदर या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण मंजूर झाले आहे. त्यासाठी लागणारा अंदाजे 5 कोटीचा निधीही  मंजूर झाला आहे. या रस्त्याची वर्कऑर्डर लवकरच निघणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची आणि वाहनचालकांची कसरत थांबणार आहे, अशी माहिती सभापती दिलीप भोईर यांनी दिली. सभापती दिलीप भोईर हे हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेण्यासाठी केवळ पाठपुरावा करीत नाहीत तर ते काम मार्गीही लावतात, अशी प्रतिक्रिया एका रिक्षाचालकांनी यावेळी व्यक्त केली.

 

अवश्य वाचा