मुंबई  

मागील महिनाभर चीनसारख्या महासत्तेला झुंझवणार्‍या करोना विषाणूने आज गुंतवणूकदारांना सळो की पळो करून सोडले. करोनाने आशिया आणि युरोपात हातपाय पसरून जीव घेण्यास सुरुवात केल्यानंतर धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी आज शुक्रवारी बाजारात तुफान विक्री केली. या पडझडीत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल 1448 अंकांनी घसरला. तो 38297 अंकांवर आला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 431 अंकांनी घसरून 11 हजार 201 अंकांवर बंद झाला. आजच्या पडझडीत गुंतवणूकदारांचे जवळपास 6 लाख कोटींची नुकसान झाले. मागील सहा सत्रात गुंतवणूकदारांनी 10 लाख कोटी गमावले आहेत.

बाजार उघडताच आज तुफान विक्री सुरु झाली आणि अवघ्या पाचच मिनिटांत सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला. सर्वच क्षेत्रात विक्रीचा प्रचंड मारा सुरु झाला जो अखेरपर्यंत थांबला नाही आणि गुंतवणूकदार पोळून निघाले. आज बँका, ऑटो, तेल आणि वायू, फार्मा , मेटल, एफएमसीजी, एनर्जी यासारख्या क्षेत्रात प्रमुख कंपन्यांचे शेअर जोरदार आपटले. घसरणीची तीव्रता इतकी होती कि सेन्सेक्स 2600 अंकांपर्यंत आपटला होता. दिवसअखेर सेन्सेक्स तब्बल 1448 अंकांनी घसरुन 38297 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 431 अंकांनी घसरून 11 हजार 201 अंकांवर बंद झाला.

निफ्टी मंचावर 271 शेअरनी वर्षभराचा नीचांकी स्तर गाठला. ज्यात आयटीसी, ओएनजीसी, हिंदाल्को, एसीसी, एलअँडटी, गेल, बॉश्‍च, लुपिन, विप्रो, हिरोमोटो कॉर्प, एबीबी, बंधन बँक आदी शेअरचा समावेश आहे. हवाई क्षेत्रात इंडिगो, स्पाइसजेट, हे शेअर घसरले. टाटा मोटोर्सच्या शेअरमध्ये सर्वाधिक 8 टक्के घट झाली. भारत फोर्ज, अशोक लेलँड, अमर राजा बॅटरी हे शेअर 5 टक्क्यांहून अधिक घसरले. ’बीएसई’वर 1767 शेअर घसरणीसह बंद झाले. आजच्या सत्रात जवळपास 6 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

अवश्य वाचा