अलिबाग 

 अखिल भारतीय हौशी कबड्डी  महासंघातर्फे राजस्थानमधील जयपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या 67 व्या वरिष्ठ गट  राष्ट्रीय कबड्डी   स्पर्धेसाठी निवडण्यांत आलेल्या महाराष्ट्र पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी रायगडचे आंतराराष्ट्रीय कबड्डी खेळाडू आशिष अशोक म्हात्रे यांची निवड करण्यात आली  आहे.

छत्रपती पुरस्कार विजेते आशिष म्हात्रे यांचा स्थानिक संघ अष्टविनायक क्रीडा मंडळ कोळवे आहे. त्यांचा व्यावसायिक संघ बीपीसीएल आहे. रायगड जिल्हा कबड्डी   संघाचे त्यांनी 17 वेळा प्रतिनिधीत्व केले असून 4 वेळा त्यांनी रायगडचे कर्णधारपद भूषविले आहे. महाराष्ट्राच्या संघात त्यांची 7 वेळा निवड झाली. त्यांनी महाराष्ट्राचे कर्णधारपदही भूषविले आहे. आशिष म्हात्रे यांची भारतीय संघातही निवड झाली होती. चीनमधील मकाऊ येथे 2007 साली झालेल्या दुसर्या इनडोअर एशियन गेम्सध्ये सुवर्णपदक मिळविणार्या भारतीय कबड्डी  संघाचे  आशिष म्हात्रे यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. पूणे बालेवाडी येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या 21 वर्षांखालील मुलांच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. 

2007 साली महाराष्ट्र सरकारने त्यांना शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविले. मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार, रायगड जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार, पनवेलरत्न पुरस्कार, कर्णाळा भूषण पुरस्कार, आगरी समाज भूषण पुरस्कार पेण व आगरी समाज पुरस्कार रायगड असे विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

 

अवश्य वाचा