नवी दिल्ली

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनाला दिल्लीत हिंसक वळण लागलं आहे. दिल्लीत ठिकठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत. या हिंसक आंदोलात दिल्लीत पोलिसातील एक हेडकॉन्स्टेबल ठार झाला. तर पोलीस उपायुक्तांसह अनेक पोलीस जखमी झाले आहेत. दिल्लीतील गोकुलपुरी भागात आंदोलनादरम्यान गोळीबार करण्यात आला. यात कॉन्स्टेबल रतन लाल यांचा मृत्यू झाला. तर डीसीपी अमित शर्मा हे जखमी झालेत.

दिल्लीच्या जाफराबादमध्ये मोठ्या संख्येने आंदोलक जमा झालेत. आंदोलकांनी नेमौजपूर भागात दोन घरंही पेटवली. सीएएविरोधी या आंदोलनाला हिंसक स्वरुप आलंय. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रू धुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. जाफराबादमध्ये तणावाची परिस्थिती आहे. इथे एक आंदोलक खुलेआम रस्त्यावर गोळीबार करताना दिसून आला.