अलिबाग 

भाऊचा धक्का ते अलिबाग मांडवा दरम्यान जलमार्ग रो- रो सेवा मार्चमध्ये महिन्यात सुरू होत आहे. या रो -रो बोटसेवेचे तिकीट दर महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने जाहीर केले असून ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत.

प्रवाशांसाठी सर्वसाधारण श्रेणीचे दर 220, वातानुकूलित 330, तर अलिशान श्रेणीसाठी 550 रुपये दर निश्‍चित करण्यात आले आहेत. कारच्या आकारमानाप्रमाणे किमान 1100 ते 1500 आणि कमाल 1900 रुपये हे दर असणार आहेत. मात्र हे दर खूप अधिक असल्याने प्रवाशांच्या खिशाला चाट बसणार आहे.

भाऊचा धक्का ते अलिबाग मांडवा रो - रो जलवाहतूक सेवा लवकरच सुरु होणार आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डने प्रवासी व वाहनांची वाहतूक करण्याचे दर जाहीर केले. या सेवेच्या उद्घाटनाची तारीख निश्‍चित झाल्यावर अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू करण्यात येणार आहे. या जहाजाची एक हजार 500 प्रवासी आणि 200 चारचाकी वाहनांची वाहतूक करण्याची क्षमता आहे. 95 मीटर लांब आणि 18 मीटर रुंद असलेल्या या जहाजाला ताशी 15 सागरी मैलचा वेग असेल. ’प्रोटो प्रोसेस एक्सव्ही’ ही अत्याधुनिक रो -रो बोट मुंबईत दाखल झाली आहे. सध्या सुरु असलेल्या मांडवा ते गेटवे प्रवासी जलवाहतुकीचे दर हे कमी आहेत. मुंबई ते अलिबाग हे रस्तेमार्ग अंतर 125 किलोमीटर आहे. त्यामुळे रो - रो सेवेचे दर पाहता रस्त्यानेच येणे पर्यटकांना परवडणारे असेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.