रोहा

पंचायत समिती, रोहा यांच्यावतीने तालुक्यातील सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्यातील क्रीडा, कलाकौशल्याला वाव देण्यासाठी प्रथमच क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन 24 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले आहे. खा. सुनील तटकरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून महसूल विभागाप्रमाणे ग्रामविकास खात्यामधील कर्मचारी वर्गांच्या क्रीडा स्पधेर्र्ंसाठी तरतूद करण्यात यावी या मागणीसाठी अर्थमंत्री व ग्रामविकासमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करु, असे आपल्या भाषणात नमूद केले आहे.

धाटाव येथील क्रीडा संकुलात आयोजित या कार्यक्रमासाठी पं.स. सभापती गुलाब वाघमारे, उपसभापती रामचंद्र सकपाळ, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, पंडित राठोड, साधूराम बांगारे तसेच सर्व पं.स. सदस्य उपस्थित होते. कर्मचार्‍यांना त्यांच्या दैनंदिन व्यस्त कामकाजातून काहीसा विरंगुळा या महोत्सवामुळे मिळणार आहे. सांघिक क्रिकेट व कबड्डी स्पर्धा तसेच महिला कर्मचारी वर्गासाठी कबड्डी, लंगडी व खो-खो स्पर्धा याशिवाय पुरुषांसाठी हॉलीबॉल स्पर्धा आणि वैयक्तिक मैदानी स्पर्धांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, 26 फेब्रुवारी रोजी मॅरेथॉन स्पर्धा होणार असून, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आले आहेत.