माणगाव 

माणगाव येथील मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत एव्हरग्रीन क्रिकेट क्लब लोणशी मोहल्ला संघाने अंतिम सामन्यात खांदाड माणगाव ‘अ’ संघावर मात  करीत अंतिम विजेतेपद मिळवून प्रथम क्रमांकाचे 10 हजार रुपये व आकर्षक चषक पटकावले. येथील माणगाव क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नाणोरे क्रिकेट संघातर्फे ही स्पर्धा घेण्यात आली.

माणगाव शासकीय विश्रामगृहासमोरील मैदानावर ही स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेतील उपविजेत्या खांदाड माणगाव ‘अ’  क्रिकेट संघाला 7 हजार रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकाचे विजेते तीनबत्ती नाका, जुने माणगाव  संघास 5 हजार रुपये व आकर्षक चषक व चतुर्थ क्रमांकाचे विजेते साईनगर क्रिकेट क्लब माणगाव संघास 3 हजार रुपये व आकर्षक चषक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून खांदाड माणगाव ‘अ’ संघाचा खेळाडू रोशन दसवते, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून एव्हरग्रीन लोणशी मोहल्ला संघाचा खेळाडू हासिब काझी तर मालिकावीराचा बहुमान तीनबत्ती नाका, जुने माणगाव संघाचा अष्टपैलू खेळाडू कुणाल सुतार यांनी पटकावला. या सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत योगेश क्षीरसागर, इंदापूर व राजू चोरगे, तळा यांनी पंचांची उत्कृष्ट कामगिरी बजावली.