अलिबाग 

 सलग तीन दिवस आलेल्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले अलिबाग दिशेने वळली. या सुट्टीचा आनंद लुटताना पर्यटकांची अलिबागसह तालुक्यातील इतर समुद्रकिनार्यांवर मोठी गर्दी केली होती.

नाताळपासून इथला पर्यटन हंगाम सुरू झाला असून नववर्ष स्वागतासाठी देखील पर्यटकांनी इथं मोठया संख्येने हजेरी लावली होती . पर्यटकांची ही वर्दळ अजूनही कायम असल्याचे दिसून आले . शुक्रवारी महाशिवरात्र व त्यालाच जोडून शनिवार रविवार अशा तीन दिवस सलग सुटयांची संधी साधत पर्यटकांनी पुन्हा किनारे गाठले . अलिबाग, काशिद, किहीम, वरसोली, मुरूड, नागांव या समुद्रकिनार्यांवर पर्यटकांसाठी उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांमुळे गेल्या काही वर्षात पर्यटनाच्या माध्यमातून अलिबागला फार महत्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक मोठ्या सुट्टीला, शनिवार-रविवार पर्यटक आवर्जुन अलिबागला येत असतात.

शुक्रवारपासूनच पर्यटकांनी अलिबागकडे येण्यासाठी गेट वे-मांडवा बोट सेवेकडे गर्दी केली होती. शनिवारी सायंकाळी तर गेट वे वरून मांडवाकडे येण्यासाठी एकाच जलवाहतूक कंपनीच्या दोन-दोन बोटी सोडाव्या लागल्या.

ताजी मासळी, स्वच्छ हवा, समुद्रात बोटींगची सुविधा, कुलाबा किल्ला यामुळे पर्यटक वारंवार अलिबागला येत असल्याचे पहायला मिळत आहे. या पर्यटकांमुळे स्थानिकांनाही चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. कॉटेजची संख्या वाढली आहे. त्याबरोबरच वाहतुकीच्या सोयी-सुविधा उपलब्ध असल्याने पर्यटक अलिबागसह मुरूडपर्यंतच्या समुद्रकिनार्यांवर आपली सुट्टी आनंदात घालवत असल्याचे चित्र पहायला मिळते.

 

अवश्य वाचा