वेलिंग्टन 

न्यूझीलंड विरुद्धची पहिली  कसोटी सामना वाचवण्यासाठी भारतीय फलंदाजांना मोठा संघर्ष करावा लागणार अशी चिन्ह दिसत आहेत. पहिल्या डावात 183 धावांची आघाडी घेतल्यानंतर, दुसर्‍या डावातही भारताचे चार फलंदाज माघारी परतले आहेत. मयांक अग्रवालचा अपवाद वगळता भारताच्या आघाडीच्या फळीतला एकही फलंदाज त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकला नाही.

मयांकने 58 धावांची खेळी केली. मात्र चार फलंदाज माघारी परतल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी जोडीने अखेरच्या सत्रातली षटकं खेळून काढत संघाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. तिसर्‍या दिवसाअखेरीस भारत 4 गड्यांच्या मोबदल्यात 144 धावांपर्यंत पोहचला होता. अजुनही भारत 39 धावांनी पिछाडीवर असून भारताला न्यूझीलंडसमोर मोठं आव्हान निर्माण करण्यासाठी चौथ्या दिवशी आक्रमक खेळ करावा लागणार आहे.

 दुसर्‍या डावात भारतीय सलामीवीरांनी डावाची सावध सुरुवात केली. मात्र ट्रेंट बोल्टने मुंबईकर पृथ्वी शॉला माघारी धाडत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर मैदानात आलेल्या चेतेश्‍वर पुजाराने मयांक अग्रवालच्या साथीने खेळपट्टीवर तळ ठोकत भारताचा डाव सावरला. या दोघांनीही दुसर्‍या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. मयांक अग्रवालने यादरम्यान आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. मात्र चहापानाच्या आधीच्या षटकात पुजारा ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. चहापानाच्या सत्रानंतर मयांक अग्रवाल आणि विराट कोहली हे देखील माघारी परतल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. मात्र अजिंक्य-हनुमाने भारताचा डाव सावरवला. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने 3 तर टीम साऊदीने 1 बळी घेतला आहे.

 त्याआधी, जसप्रीत बुमराहने तिसर्‍या दिवसाच्या सुरुवातीलाच वॉटलिंगला माघारी धाडत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. मात्र यानंतर कॉलिन डी-ग्रँडहोम आणि जेमिसन यांनी 71 धावांची भागीदारी रचत न्यूझीलंडची बाजू अधिक भक्कम केली. या भागीदारीदरम्यानच यजमान संघाने भारतावर शतकी आघाडी घेतली. आश्‍विनने जेमिसनला माघारी धाडत भारताला यश मिळवून दिलं. मात्र ट्रेंट बोल्टने अखेरच्या विकेटसाठीही फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं. बोल्टने 38 धावा केल्या. भारताकडून इशांतने 5, रविचंद्रन आश्‍विनने 3 तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

 

अवश्य वाचा