पनवेल 

 भाडेतत्वावर तळोजा फेज 1 येथील सेक्टर 9 या ठिकाणी असलेल्या शिव कॉर्नर सोसायटीत भाडेतत्वावर राहणार्या उपाध्याय कुटुंबियांचे चौघांचे मृतदेह शनिवारी सकाळी बेडरुममध्ये आढळून आल्याने सदर इमारतीसह परिसरात खळबळ उडाली असून या चौघांनी आत्महत्या केली की त्यांचे आधी खुन करून नंतर आत्महत्येचा बनाव करण्यात आला का? याचा शोध तळोजा पोलीस करीत आहेत. या संदर्भात तळोजा पोलीस ठाण्यात भादवी 302 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळोजा फेज 1 येथील सेक्टर 9 या ठिकाणी असलेल्या शिव कॉर्नर सोसायटीच्या डी विंगमधील पाचव्या मजल्यावरील 502 हा ब्लॉक राजेश भारद्वाज या मुळ मालकांचा ब्लॉक असून त्यांनी तो आठ महिन्यापूर्वी नितीश कुमार उपाध्याय यांना भाड्याने दिला होता.  ब्लॉकचे नितीश कुमार उपाध्याय हे नियमित 5 ते 6 तारखेला भाडे देत असत. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून ब्लॉकचे भाडे त्यांना मिळाले नाही. तसेच त्यांनी केलेला मोबाईल फोन सुद्धा नितीश कुमार यांनी उचलला नाही. त्यामुळे  शनिवारी सकाळी मुळ मालक राजेश भारद्वाज हे या सोसायटीत आले व त्यांनी सोसायटीचे चेअरमन व सेक्रेटरी यांना घेवून त्यांच्या ब्लॉकवर गेले.  ब्लॉक हा आतून बंद आढळून आल्याने भारद्वाज यांच्याकडे असलेल्या दुसर्‍या चावीने सदर ब्लॉक उघडण्यात आला. सर्व काही व्यवस्थित होते. कुठल्याही सामानाची उलथापालथ झाल्याचे दिसून आले नाही. त्यानंतर ते सर्व बेडरुममध्ये गेले असता बेडरुमचा दरवाजा बंद आढळला. तो उघडला असता त्यांना कुबट असा वास आला व नितीश कुमार उपाध्याय (35) यांची फक्त मुंडकी पंख्याला लटकताना आढळली व त्यांचा इतर देह खाली पडलेल्या व कुजलेल्या अवस्थेत होता. तशाच प्रकारे नायलॉन दोरी व इतर कपड्यांच्या सहाय्याने एका अंदाजे 30 वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत व तीच्या बाजूला अंदाजे सात वर्षीय मुलगा व अंदाजे आठ वर्षीय मुलीचा मृतदेह सुद्धा अशाच पद्धतीने कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने तात्काळ त्यांनी याबाबतची माहिती तळोजा पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच तळोजा पोलीस ठाण्याचे वपोनि काशिनाथ चव्हाण व त्यांचे पथक घटनास्थळी आले व त्यांनी याबाबतची माहिती परिमंडळ 2 चे उपायुक्त अशोक दुधे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांना दिली. तातडीने हे सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी त्यांचा तपास सुरू केला.

प्राथमिक माहितीमध्ये सदर व्यक्तींनी प्रथम या तिघांना जीवे ठार मारुन त्यानंतर स्वतः गळफास घेवून आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सुद्धा मिळाल्याचे समजते. त्याचप्रमाणे दोन महिन्यांचे थकीत भाडे 16 हजार रुपये सुद्धा तेथे ठेवल्याचे समजते. या संदर्भात पोलिसांनी प्राथमिक खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली. परंतु उपाध्याय कुटुंबियांची पूर्ण नावे देण्यास पोलिसांनी सध्या तरी नकार दिला आहे.