अलिबाग 

एलईडी पर्सोनेट पद्धतीच्या बेसूमार मासेमारीमुळे पारंपारिक मच्छिमार उध्वस्त होण्याच्या मार्गावर असून त्यांचे मोठं नुकसान होत आहेच. त्याचबरोबर अनेक मत्स्य प्रजाती नष्ट झाल्याच तर भविष्यात सुमारे 40 मत्स्य प्रजाती नष्ट झाल्या होण्याच्या मार्गावर आहेत. शासनाचे नियंत्रण नसल्यामुळे बंदी असतानाही एलईडी-पर्सोनेट मासेमारी सुरु असल्याने मोठया प्रमाणावर समुद्रातील मासे खेचून नेण्यात येत असल्याने पारंपारिक मासेमारांना हात हलवत परत यावे लागत आहेत.

त्यामुळे हतबल झालेले रेवस परिसरातील तब्बल 300 मासेमारी करणार्‍या टॉलर्स 1 फेबु्रवारीपासून 22 दिवस खाडीत उभ्याच आहेत. त्यामुळे या परिसरातील मासेमारांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. काही दिवसात सरकारने कडक कारवाई करुन जर एलईडी पर्सोनेट मासेमारी पुर्णपणे बंद केली नाही तर मात्र तीव्र आंदोलन छेडण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नसेल असा निर्वाणीचा इशारा मच्छिमार समाजाने दिला आहे.

शासनाने एलईडी दिव्यांच्या साह्याने मासेमारी करण्यावर निर्बंध घातले आहेत. त्याचबरोबर पर्सेसिन, बुलनेट पध्दतीने मासेमारी करण्यावरही प्रतिबंध केला आहे. मात्र तरीही मोठया प्रमाणावर मच्छिमार पर्सोनेट तसेच एलईडी दिव्यांचा वापर करून बेसुमार मासेमारी करत आहेत. वारंवार तक्रारी करूनही जिल्हा प्रशासनाने एलईडी  पध्दतीने मासेमारी करणार्‍यांवर कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही.

एलईडी मच्छिमारीमुळे पारंपारिक मच्छिमार बुडाला आहे. त्याचा संसार उसनवारीवर सुरू आहे. त्यामुळे त्याची होणारी उपासमार ही थांबायची असेल तर एलईडी पद्धतीची मच्छिमारी बंद व्हायला हवी, अशी भुमिका मच्छिमार बांधवानी घेतली आहे.

आम्ही देखील अशा प्रकारची बेसुमार मासेमारी करू शकतो पण जर असे केले तर आमच्या भावी पिढींसाठी समुद्रातील सर्वच मत्स्य प्रजाती नष्ट होतील. आणि मासेमारीचा व्यवसाय करण्यासाठी पर्यायच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे भविष्याचा विचार करून आम्ही हे करायला तयार नसल्याचे अंकुश गोवर्धन कोळी, धनाजी गणपत कोळी यांनी सांगितले.

500 कुटूंबाचा उधरनिर्वाह अवलंबून असणार्‍या रेवस बोडणी परिसरातील सुमारे 300 बोटी आहेत. मात्र बंदी असतानाही पर्सोनेट आणि एलईडी मासेमारी करणार्‍या बोटींद्वारे मुंबई ते रत्नागिरी परिसरातील समुद्रात 12 नोटिकल च्या आत आणि बाहेरही बेसुमार मासेमारी सुरु आहे. यात मोठया प्रमाणावर पैसा दिसत असल्याने मोठे भांडवलदार यात उतरलेत. त्यामुळे बंदी घालुनही कोणालाही न जुमानता मासेमारी केली जात आहे. या एकेक बोटी 2 दिवसात 30 ते 20 टन सर्व प्रकारचे लहानमोठे मासे गोळा करुन काढले जातात. त्यामुळे त्या संपूर्ण परिसरात एकही मासा उरत नसल्याने पारंपारिक पद्धतीने मासेमारीला जाणार्‍या बोटींना हात हलवत परत यावे लागत आहे. त्यातच प्रत्येक फेरीसाठी बर्फ, डिझेल, पगारावर केलेला खर्चही पाण्यात जात आहे. साधारणतः एका ट्रीपला 4,50 लाख खर्च वाया जात असल्याचे मच्छिमारांनी सांगितले. त्यामुळे आम्हाला आमच्या बोटी उभ्या ठेवण्यावाचून पर्यायच उरला नाही. जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर मात्र आम्हाला तीव्र आंदोलनाच पवित्रा घेण्यावाचून कोणताच पर्याय उरणार नसल्याचे सांगतानाच कमल्या नाखवा यांनी सांगितले की समुद्र आमची शेती आहे ती आयुष्य भर आम्हाला ती जगवायची आहे जालायची नाही. त्यामुळे सरकारने पुढाकार घेऊन कडक पावले उचलायला हवी. अशा प्रकारची बेसुमार मासेमारी चालुच राहिली तर आमचे पुढचे भविष्य काय, मासेच नष्ट झाली तर आम्हाला सरकार रोजगार देणार का असा सवालही मासेमार समाजाकडून केला जात आहे.

 40 वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर मासळी मिळत होती. मागील काही वर्षांपासून सुरु असलेली एलईडी बंद झालीच पाहिजे सरकारला जाग आलीच पाहिजे. बेसुमार मासेमारी मुले नष्ट होत असल्यामुळे आमच्यापुढे कोणताही पर्याय राहिलेला नाही. जर असेच कायम राहिले तर आम्ही आत्महत्या करायची का  सरकारच्या जी आर लाच हरताळ फासला जात आहे. तीव्र आंदोलन करावे लागेल आणि त्याची जबाबदारी संपूर्ण सरकारची असेल