पाली/बेणसे

विळे येथील काही शिक्षक व प्राणीमित्र यांनी मिळून नुकतेच एका जखमी दुर्मिळ गव्हाणी घुबडाचे प्राण वाचवून त्याला जीवदान दिले. तसेच सभोवताली लागलेला वणवा देखील विझविला.

कुंडलिका विद्यालयात कार्यरत असणारे शिक्षक संदीप ठाकूर व जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असणारे सुभाष ओव्हाळ हे  विळा ते कोलाड या मार्गावर प्रवास करत होते.  विळे गावापासून 2 किलोमीटर अंतरावर जंगलात वणवा लागला होता. हा वणवा विझवून ते रस्त्यावर आले. त्यावेळी एका ट्रेलरच्या धडकेने गंभीर जखमी अवस्थेत फडफडणारे एक गव्हाणी घुबड त्यांना दिसले. त्यांनी तात्काळ पक्षीमित्र व शिक्षक राम मुंडे यांना फोन करून याबद्दल माहिती दिली. राम मुंढे यांनी ताबडतोब विळे येथील पक्षीमित्र ओंकार नलावडे व रणजित म्हात्रे यांना घेऊन जखमी घुबड असलेल्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी घुबडाची पाहणी केली असता त्याच्या डाव्या पायाला व डाव्या डोळ्याला गंभीर जखम झाल्याचे आढळले. त्या जखमी घुबडाला घेऊन सर्वजण ओंकार नलावडे यांच्या घरी गेले. आता ते घुबड पक्षीमित्र ओंकार नलावडे यांच्याकडे योग्य उपचार घेत आहे. घुबडाची जखम बरी झाल्यावर आणि त्याला उडता येऊ लागल्यानंतर त्याला सुखरूप जंगलात सोडण्यात येणार असल्याचे ओंकार नलावडे यांनी सांगितले. आणि रविवारी हे घुबड व्यवस्थित होऊन रात्री उडून गेले.