नेरळ 

माथेरान या पर्यटन स्थळी जाण्यासाठी असलेला नेरळ-माथेरान घाटरस्त्याचे मजबुतीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू आहे.रस्त्याचे अर्धे काम देखील झाले नसताना एमएमआरडीएने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने हस्तांतरण करून घ्यावा अशी सूचना पत्रव्यवहार करून केली आहे.दरम्यान,या रस्त्याचे अर्धे देखील काम झाले नसताना प्राधिकरणने आपल्या ठेकेदारालासांभाळण्यासाठी ही मखलाशी केली आहे याबद्दल या रस्त्याने वाहतूक करणारे नाराजी व्यक्त करीत आहेत.

2016 मध्ये नेरळ-माथेरान घाटरस्त्याचे मजबुतीकरण हे 27 कोटी रुपयांचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून सुरू करण्यात आले.27 कोटी रुपयांच्या निधीमधून रस्त्याच्या दुतर्फा आरसीसी काँक्रीटची गटारे,रस्त्यात असलेल्या दरीच्या बाजूला संरक्षक भिंती आणि डांबरीकरण ही कामे तसेच घाटात जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी सेल्फी पॉईंट तसेच बैठक व्यवस्था करण्याचे निविदेत नमूद होते.ही निविदा मुंबई येथील  एफए कन्स्ट्रक्शन कंपनीला प्राप्त केली होती.घाटात आतापर्यंत रस्त्यात संपूर्ण सात किलोमीटर भागात म्हणजे कर्जत-कल्याण रस्त्यावरील हुतात्मा चौकातून दस्तुरीनाका पूर्णपणे एकही बाजूला आरसीसी गटारे बांधलेली नाहीत.त्याचवेळी घाट रस्त्यात कुठेही अखंडपणे संरक्षक भिंती बांधण्यात आल्या नाहीत.तर घाटमार्गात हुतात्मा चौक ते जुमापट्टी या भागातील रस्त्यावर डांबरीकरण केले होते.पण आजच्या घडीला या भागात अनेक ठिकाणी डांबर वाहून गेले आहे.तर दरीच्या बाजूला रस्ता अनेक ठिकाणी नवीन डांबरीकरण खचले आहे.तर याच घाटरस्त्यात खड्डे भरण्याचे काम मुंबई येथून आलेल्या एफए कन्स्ट्रक्शन कंपनीने भरले होते.पण त्या ठिकाणी टाकलेले डांबर नित्कृष्ठ दर्जाचे असल्याने सर्व डांबर वाहून गेले आहे.तो रस्ता पुन्हा सुस्थितीत करण्यासाठी एमएमआरडीएला घाटरस्ता 13 तास वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता.

रस्त्यावर बांधलेल्या गटाराचे वर क्रश बॅरिअर लावण्यात आले आहेत.ते काम देखील 100टक्के पूर्ण नसताना एमएमआरडीएने मे 2018 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पनवेल येथील कार्यकारी अभियंता यांना पत्र पाठवून नेरळ-माथेरान घाटरस्ता हस्तांतरण करून घेण्याची सूचना केली होती.ही घाई कशासाठी असा प्रश्‍न निर्माण झाला असून घाटरस्त्याचे काम नित्कृष्ठ दर्जाचे केल्याने घाटरस्ता बंद करावा लागत असेल तर प्राधिकरण आपल्या ठेकेदाराला सांभाळण्यासाठी असा पत्रव्यवहार करीत आहे असा आरोप देखील होत आहे.ते आजही कायम असून रस्त्यावरील संरक्षण भिंती कोसळण्याची स्थिती असताना रस्ता हस्तांतरण घाई कशाला असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.