सुधागड-पाली 

जिल्ह्यात यंदा झालेली अतिवृष्टी, अवकाळी व लांबलेला पाऊस यामुळे कलिंगडाची लागवड उशिरा झाली आहे. तसेच यामुळे कलिंगडाचे उत्पादन उशिरा हाती येऊन उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणात घट होण्याची चिन्हे आहेत. परिणामी कलिंगडाच्या किंमती मागील वर्षी पेक्षा 20 ते 30 टक्क्यांनी वधारल्या आहेत. मात्र वाढता उष्मा क्षमविण्यासाठी कलिंगड खरेदीसाठी खवय्यांच्या उड्या पडत आहेत.

खराब हवामान, अतिवृष्टी व अवकाळी यामुळे रब्बी हंगामातील कडधान्य व कलिंगड आदी उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. जिल्ह्यात साधारण 200 हेक्टर क्षेत्रावर कलिंगडाची लागवड केली जाते. मात्र यंदा पाऊस खूप लांबला आणि अवकाळी पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले. पाऊस लांबल्याने कलिंगडाची लागवड खूप उशिराने झाली. अनेक शेतकर्‍यांनी कलिंगड शेती केली नाही. त्यामुळे कलिंगडाचे क्षेत्र देखील घटले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ज्या शेतकर्‍यांनी कलिंगडाची लागवड केली आहे. त्यांच्या हाती कलिंगडाचे उत्पादन खूप उशिराने येणार आहे. सध्या जिल्ह्यात रोहा तालुक्यातील काही ठिकाणी कलिंगडाचे उत्पादन हाती आले आहे. आणि जिल्ह्यातील इतर ठिकाणी हे कलिंगड विक्रीसाठी आणले जात आहेत.  यंदा मात्र स्थानिक कलिंगडाच्या किंमती वाढल्या आहेत. मागील वर्षी 8 हजार रुपये टन या घाऊक दराने मिळणारे कलिंगड आता तब्बल 11 ते 12 हजार रुपये टन या घाऊक दराने मिळत आहे. परिणामी किरकोळ बाजार देखील कलिंगड महागले आहे. गेल्यावर्षी साधारण 50 ते 60 रुपयांना मिळणारे मध्यम आकाराचे कलिंगड आता 80 ते 90 रुपयांना मिळत आहे. स्थानिक बाजारात पुणे व इतर ठिकाणची कलिंगडे देखील दाखल झाली आहेत. त्यांच्याही किंमती मागील वर्षी पेक्षा यावर्षी 10 ते 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. मात्र यंदा जिल्ह्यात थंडी गायब झाली असून प्रचंड उष्मा जाणवत आहे. परिणामी शरीराला थंडावा देण्यासाठी लोक कलिंगड खाणे पसंत करत आहेत. त्यामुळे किंमती वाढल्या असल्यातरी कलिंगड विक्रीत वाढच होतांना दिसत आहे.