नेरळ  

कर्जत तालुक्यातील सांगवी गावातील तरुणाचे रात्री साडे अकरा वाजता चार पांढर्‍या रंगाच्या गाड्यामधून आलेल्या अज्ञात इसमांनी अपहरण केले होते.उल्हासनदी मध्ये एक किलोमीटर धावत जात अपहरण करण्यात आल्याची तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात येताच कर्जत पोलिसांनी दाखवलेली सतर्कता यामुळे अवघ्या चार तासात अपहरणकर्ते यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून सर्व अपहरणकर्ते पोलिसांच्या ताब्यात असून फिल्मी स्टाईलने अपहरण घटनेत वापरण्यात आलेल्या गाड्या देखील कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

गणेश अनंता घारे हे 35 वर्षीय तरुण आपल्या मित्रांसह 20 फेब्रुवारी रोजी रात्री कर्जत सांगवी येथील उल्हासनदी मध्ये आपल्या दोन मित्रांसह गप्पा मारत बसले होते.अतुल घारे आणि रमेश घारे यांच्यासोबत गप्पा मारत असताना रात्री अकरा च्या दरम्यान तेथे नदीच्या बाजूला रस्त्यावर चार पाच पांढर्‍या रंगाच्या गाड्या येऊन उभ्या राहिल्या.त्यातील लोक आपल्याकडे ओरडत येत असल्याने नदीमध्ये बसलेले ते तिघेही पळून जाऊ लागले.मात्र गाड्यामधून आलेल्या अज्ञात लोकांनी त्यांना पकडण्यासाठी धाव घेतली.नंतर एक किलोमीटर अंतर धावत जाऊन गणेश अनंता  घारे यांना पकडले.त्यानंतर त्यांना पकडून गाडीमध्ये टाकून त्या गाड्या कर्जतच्या दिशेने निघून गेल्या.

त्यावेळी गणेश घारे यांच्या बरोबर असलेले तरुण हे धावत सांगवी गावात पोहचले आणि तेथे घडलेली घटना गणेश घारे यांच्या घरी सांगितली. त्यानंतर अपहरण झालेले तरुण गणेश घारे यांचे बंधू योगेश अनंता घारे यांनी बारा वाजता कर्जत पोलीस ठाणे गाठले.तेथे कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण भोर यांच्याकडे आपल्या भावाचे अपहरण केले असल्याची तक्रार केली.मात्र त्याचवेळी गणेश घारे यांच्या मोबाईल वर एक फोन आला आणि त्यांनी तुमचा माणूस माझ्याकडे नेरळला आहे.या माहितीच्या आधारे पोलिसांनी नेरळ पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधला आणि पहाटे कर्जत पोलीस नेरळ येथे पोहचले.पोलीस निरीक्षक भोर,पोलीस उपनिरीक्षक गावडे यांच्या मदतीला नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील हे सर्व नेरळ गावातील आनंद वाडी येथे पोहचले.

 तेथे अपहरण करून आणलेला गणेश अनंता घारे यांना ठेवण्यात आले होते आणि त्या खोलीच्या बाहेर राजू बबन मरे हे बाहेरच्या खोलीमध्ये झोपले होते. पोलिसांनी प्रथम गणेश घारे यांची सुटका करून त्यांच्याकडून माहिती घेऊन अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या हुंडाई व्हर्ना आणि इनोव्हा या दोन गाड्या तसेच गणेश घारे यांचे अपहरण करणार्‍या अन्य पाच जणांना कर्जत पोलिसांनी ताब्यात घेऊन रात्रीच कर्जत पोलीस ठाणे गाठले.