वेलिंग्टन 

कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने वेलिंग्टन कसोटी सामन्यात आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला पहिल्या डावात 165 धावांवर गारद केल्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजाचा नेटाने सामना करत, सामन्यावर आपली पकड घट्ट बसवली. कर्णधार विल्यमसन आणि रॉस टेलर यांनी तिसर्‍या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी रचत संघाचं पारडं जड ठेवलं.

विल्यमसनने आपल्या ठेवणीतले फटके खेळत सुरेख फटकेबाजी केली. आपला 100 वा कसोटी सामना खेळणार्‍या रॉस टेलरनेही त्याला चांगली साथ दिली. ही जोडी मैदानावर स्थिरावलेली असतानाच, इशांत शर्माने पुन्हा एकदा भारताला यश मिळवून दिलं. 44 धावांवर खेळत असताना इशांतने टाकलेल्या बाऊन्सर चेंडूचा अंदाज न आल्याने टेलर पुजाराच्या हाती झेल देऊन माघारी परतला. याचसोबत कसोटी क्रिकेटमध्ये रॉस टेलरला सर्वाधिकवेळा बाद करणार्‍या भारतीय गोलंदाजांच्या यादीत इशांतला आता तिसरं स्थान मिळालं आहे.

इशांत शर्मानेच भारताला पहिलं यश मिळवून दिलं. सलामीवीर टॉम लॅथमला यष्टीरक्षक पंतकडे झेल देण्यास भाग पाडत इशांतने न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. यानंतर विल्यमसन आणि ब्लंडल यांची भागीदारीही इशांतने ब्लंडलचा त्रिफळा उडवत मोडली.

कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलरने फटकेबाजी करत न्यूझीलंडला आघाडी मिळवून देण्यात मदत केली. तिसर्‍या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी करणार्‍या रॉस टेलरचं अर्धशतक 6 धावांनी तर कर्णधार केन विल्यमसनचं शतक 11 धावांनी हुकलं. भारताकडून इशांत शर्माने दुसर्‍या दिवसाच्या अखेरीस 3 तर मोहम्मद शमी आणि रविचंद्रन आश्‍विनने प्रत्येकी 1-1 बळी घेतला. विल्यमसनने 89 धावा केल्या.

अवश्य वाचा