राजापूर  

रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केल्यामुळे शिवसेनेचे सागवे विभाग प्रमुख राजा काजवे यांची पक्षाने उचलबांगडी केल्यानंतर शिवसेनेमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. काजवे यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ सागवे विभागातील उपविभाग प्रमुखांसह 22 शाखाप्रमुखांनी तसेच शिवसैनिकांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काजवे यांच्या हाकालपट्टीचा निर्णय शिवसेनेच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफानरी प्रकल्पावरून तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. रिफायनरी प्रकल्प राजापूरातच व्हावा यासाठी सध्या जोरदार उठाव सुरू आहे. यापुर्वी प्रकल्पाला जोरदार विरोध करणऱया शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारीही प्रकल्पाच्या समर्थनार्थ सरसावले आहे.  देवाचे गोठणे आणि सागवे विभागातील शिवसेना पदाधिकाऱयांनी आयलॉग व रिफायनरी प्रकल्पाच्या बाजूने आवाज उठविताना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत आपल्या भावना  पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश न आल्याने मुख्यमंत्री ठाकरे कोकण दौऱयावर आलेले असताना शिवसैनिकांनी रस्त्यावर निदर्शन करत रिफायनरी तसेच आयलॉग प्रकल्प राजापूरातच व्हावा अशी आग्रही मागणी केली. शिवसेनेचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध असताना सेना पदाधिकाऱयांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने सेनेच्या वरीष्ठ पातळीवरून सागवे विभागप्रमुख राजा काजवे यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली.

या कारवाईचे तीव्र पडसाद तालुक्यात वेशेषतः उमटत आहेत. या कारवाईच्या निषेध करत राजा काजवे यांना पाठींबा व्यक्त करत शिवसेनेच्या सागवे उपविभाग प्रमुखांसह 22 शाखाप्रमुखांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. गुरूवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैकीला माजी विभागप्रमुख राजा काजवे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी शिवलकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व सदस्य विलास अवसरे, अजित नारकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांना उद्देशून या पदाधिकाऱयांनी राजीनामा पत्र लिहीले आहे. गुरूवारी बैठकीनंतर या पदाधिकाऱयांनी तालुकाप्रमुखांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र भेट न झाल्याने राजीनामे त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत. शिवसेनेकडून राजीनामास्त्र उगारलेल्या पदाधिका़र्‍यांमध्ये उपविभागप्रमुख मंगेश सिताराम मांजरेकर यांच्या सह कात्रादेवी शाखाप्रमुख अरुण नारायण गुरव यांच्यासह बहुसंख्य पदाधिकार्‍यांचा समावेश आहे.

राजापूर तालुक्यातील रिफायनरी तसेच आयलॉग प्रकल्पाला मोठया प्रमाणात समर्थन लाभत असताना शिवाय शिवसैनिकही समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेले असताना सेनेचे वरीष्ठ पातळीवरील नेत्यांची प्रकल्प विरोधी भूमिका आजही कायम आहे. यातूनच प्रकल्पाचे समर्थन करणाऱया पदाधिकाऱयांवर कारवाईचे सत्र पक्षाने सुरू केले आहे. मात्र हा निर्णय आता पक्षाचा चांगलाच अंगलट येताना दिसत आहे. पक्षाच्या निर्णयाविरोधात शिवसैनिकांनी बंड पुकारल्याने आता शिवसेनेला याबाबत फेरविचार करावा लागण्याची शक्यता आहे. 

अवश्य वाचा