रोहा 

 मागील वर्षभरात झालेल्या निवडणुकांमध्ये आघाडीच्या नेते मंडळींनी तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा या गाण्यातील बोलाप्रमाणे लोकसभा निवडणुकीत प्रचार केला.  काँग्रेस ,शेकाप,राष्ट्रवादी काँग्रेस, कवाडे गट यासह अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी देखील सर्व मतभेद विसरून सुनिल तटकरे यांना नरेंद्र मोदींच्या त्सुनामी लाटेत देखील भरघोस मतांनी निवडून आणले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सुनिल तटकरे यांनी निवडून आल्या नंतर मापात पाप करणार नाही.आघाडीच्या नेते मंडळींना विश्‍वासात घेऊन काम करणार असल्याचे सूतोवाच वारंवार केले होते.

मात्र मागील वर्षभरात आघाडीचे खासदार सुनिल तटकरे यांनी केवळ स्वतःचा उदोउदो चालविला असल्याने आघाडीचे खासदार सुनिल तटकरे यांचे माप हरवले कुठे असा प्रश्‍न आघाडीच्या नेते मंडळींना पडला असून तटकरेंकडून रायगडात आघाडी धर्माची ऐशी की तैशी सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

आदिती तटकरे वगळता  जिल्ह्यातील आघाडीच्या अन्य उमेदवारांना मात्र विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.या उमेदवारांचा पराभव होण्यासाठी सुनिल तटकरे यांनी अप्रत्यक्ष हातभार लावल्याची चर्चा आता खुलेपणाने होऊ लागली आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघातील पेण, अलिबाग,महाड,दापोली,गुहागर या पाच मतदारसंघात आघाडीच्या उमेदवारांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अपवाद फक्त श्रीवर्धन मतदारसंघाचा ,आघाडीच्या अन्य उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव होत असताना शिवसेना उमेदवार विनोद घोसाळकर यांचा मात्र चाळीस हजार मतांनी श्रीवर्धन मतदारसंघात पराभव झाला.

त्या नंतरच्या महाराष्ट्रातील सत्तानाट्यात शिवसेनेचे तीन वेळा निवडून आलेले आ भरत गोगावले यांना वंचित ठेवून सुनिल तटकरे यांच्या कन्येला मात्र सात खात्यांच्या मंत्रीपदासह पालकमंत्रीपद देखील देण्यात आले.पालकमंत्री बदला ही रायगड मधील शिवसैनिकांची मागणी देखील मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जवळपास धुडकावून लावल्याचे चित्र आहे.यामुळे हेचि फळ काय आमुच्या तपाला असा प्रश्‍न तळागाळातील शिवसैनिकांना पडला आहे.वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसशी स्थानिक पातळीवर लढाई करणारे काँग्रेस,शेकाप,शिवसेना या पक्षाचे कार्यकर्ते मात्र हतबल झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.