कर्जत- दि.4

ठाणे - पालघर-रायगड प्रादेशिक आराखड्या मधील रायगड कर्जत तालुक्यातील बहुतांश जमिनींवर ग्रीन झोन आणि फॉरेस्ट झोन दर्शविण्यात आला आहे.आराखड्यात कुठेही वाणिज्य, औद्योगिक किंवा पर्यटन क्षेत्र दाखविले नाही.अनेकांच्या शेतजमिनीवर सुद्धा फॉरेस्ट झोन टाकला आहे.या झोन मुळे 64 गावांतील शेतक-यांवर अन्याय होणार असून त्या मुळे पुढील पिढयांचे खूप नुकसान होणार आहे.

शासनाच्या या आराखड्यावर हरकत नोंदविण्याची मुदत 7 जुलै पर्यंत आहे.जास्तीत जास्त शेतकरी बांधव आणि सामाजिक  कार्यकर्त्यांनी आपल्या गावांतील ज्या जमिनी बाधित होत आहेत त्या बाबत राजकीय हेवेदावे बाजूला सारून, सामाजिक भावनेतून हरकती नोंदवाव्यात असे आवाहन आज दि.4 जुलै रोजी कशेळे येथे झालेल्या सभेत आमदार सुरेशभाऊ लाड यांनी केले.

कशेळे येथे आयोजित केलेल्या सभेत मार्गदर्शन करताना सुरेशभाऊ लाड यांनी सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या गावातील शेतकरी बांधवांच्या जमिनीवर कोणते झोन पडले आहेत, त्या बाबत नकाशावर चेक करावे, जमिनींचा 7/12 काढावा, हरकती लिहून ते अर्ज माझ्याकडे द्यावेत. मी ते अर्ज संबंधित अधिका-यांकडे देईल. या बाबत त्यांनी आपली दखल घेतली नाही तर कायदेशीर लढाई लढण्या करिता मी वकील देईल. वेळप्रसंगी आपण या करिता आंदोलन करू असे सांगितले.

उदय पाटील यांनी प्रास्ताविका मध्ये पूर्वी एम एम आर डी ए (MMRDA) आणि आता प्रादेशिक आराखडा  च्या माध्यमांतून कर्जत तालुक्यावर शासन कसा अन्याय करीत आहे ते विशद केले. आर्किटेक्ट संजय हरपुडे यांनी शासनाने प्रकाशित केलेला नकाशा उपलब्ध करून या बाबत हरकती कशा प्रकारे आणि कोणाकडे नोंदवाव्यात याची माहिती सांगितली.

जिते येथील शेतकरी कुटुंबातील बांधकाम व्यावसायिक रमेश जाधव, पाषाणे येथील उद्योजक भानुदास येवले, मनसेचे प्रवीण गांगल, तानाजी चव्हाण यांनी यावेळी योग्य त्या सूचना मांडल्या.

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग