नवी दिल्ली

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषींना 3 मार्चला फासावर लटकवले जाणार आहे. पटियाला हाऊस न्यायालयाकडून या संदर्भातील डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता  मुकेश कुमार सिंह (32), पवन गुप्ता (25), विनय कुमार शर्मा (26) आणि अक्षय कुमार (31) अशी या दोषींना फाशी दिली जाणार आहे.

निर्भया बलात्कार प्रकरणात 22 जानेवारीचं डेथ वॉरंट जारी करण्यात आलं होतं. 22 जानेवारी 2020 ला या चौघांना फाशी देण्याची तारीख ठरली. मात्र ती पुढे ढकलण्यात आली.

या तारखेनंतर 1 फेब्रुवारीचं डेथ वॉरंट आलं. मात्र ही तारीखही पुढे ढकलण्यात आली. 1 फेब्रुवारीची तारीख पुढे ढकलली गेल्यानंतर आजवर, म्हणजेच मागच्या 16 दिवसात काहीही निर्णय आला नव्हता. आता तिसर्‍यांदा ही तारीख समोर आली आहे. नव्या डेथ वॉरंटनुसार 3 मार्च रोजी निर्भयाच्या चारही दोषींना फाशी देण्यात येईल असं कोर्टाने म्हटलं आहे.

आरोपींचे वकील ए. पी. सिंह यांनी या विषयावर भाष्य केलं आहे. एएनआयशी बोलताना ते म्हणाले,  आमच्याकडे अद्यापही पर्याय बाकी आहेत. प्रसारमाध्यमांचा आणि राजकारण्यांचा दबाव असल्याने कोर्टाने डेथ वॉरंटची तारीख दिली आहे. दरम्यान निर्भयाच्या आईने या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आहे. आता 3 मार्च ही तारीख पुढे ढकलली जाणर नाही आणि त्या दिवशीच चारजणांना फाशी दिली जाईल अशी आशा आहे असंही त्या म्हणाल्या आहेत.