अलिबाग 

देशाची भावी पिढी घडवायची असेल तर विद्यार्थ्यांना माणूस बनवा, रोबो नको, शिक्षण कसे दिले पाहिजे, विद्यार्थ्यांवर शिक्षणाचा प्रभाव कसा पडला पाहिजे, विद्यार्थ्यांना जबरदस्तीने नाही तर प्रेमाने शिकवले पाहिजे नम्रतेने जग जिंकता येते, अभ्यासा व्यतिरिक्त विद्यार्थ्यांचा कल बघून त्यांस शिक्षण दिले पाहिजे असे केल्यास शाळेकडे अँडमिशन घेण्यासाठी लाईन लागेल. येत्या काही वर्षात पीएनपीच्या शाळांमध्ये अँडमिशन घेण्यासाठी एक किंवा दोन वर्ष पालकांना वाट पहावी लागणार आहे. असे ठाम प्रतिपादन भंडारा जिल्ह्यातील खराशी गावातील प्रयोगशील शिक्षक मुबारक सय्यद यांनी केले. पीएनपी एज्युकेशन सोसायटी वेश्‍वी संकुल येथे पीएनपी शाळांचे जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी ते बोलत होते. त्यांना शिक्षण क्षेत्रात एक प्रयोगशील शिक्षक म्हणून काम करताना आलेले चांगले, वाईट अनुभव आणि पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये केलेला एक सकारात्मक बदल या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.  

या प्रसंगी पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, प्रशासन अधिकारी अमित देशपांडे सर्व मुख्याध्यापक आदि मोठ्या संखेने उपस्थित होते.

या पुढे मार्गदर्शन करताना मुबारक सय्यद यांनी संगितले की, शाळेमध्ये मुलांना शिकवताना त्यांचे मित्र म्हणून त्यांच्याशी वागा, चांगले ते चांगले आणि वाईट ते वाईट हे त्यांना पटवून द्या. मेल्या नंतर सर्वजण एखाद्या व्यक्तीचे कौतुक करतात पण जिवंत माणसाचे कौतुक केले तर त्याला जगण्याची स्फूर्ति मिळते. शिक्षकांनी पालकांचा विश्‍वास जिंकणे गरजेचे, नम्रता महत्वाची, शिक्षकांनी स्वत:हून जबाबदारी घ्यायला शिका, सर्व प्रथम विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेवर प्रेम करायला शिकवा, त्यांचा आत्मविश्‍वास पहिल्यांदा निर्माण होऊ द्या, नंतर कठीण वाटणारी इग्रजी बोलायला शिकवा. आज कालच्या मुलांना मोबाईलचा सकारात्मक उपयोग पटवून द्या तरचं मुलांची वापरण्याची पद्धत बदलेल. आपल्या सर्वांकडे चांगले शिकवण्याचे कौशल्य आहे, पण ते  ट्रकवर आणले पाहिजे.

शाळा कशी आहे ? त्याचे बांधकाम कसे आहे ? ते कुठे आहे ? त्या पेक्षा शाळेतील शिक्षण कसे आहे, या पेक्षा शाळेची शैक्षणिक प्रगती कशी आहे, हे विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे आहे.    

मुबारक सय्यद यांनी आपण शाळेतील 148 पोरांचा बाप असल्याचे आवर्जून नमूद केले. याशिवाय शाळेत विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेली स्कूल बँक हेसुद्धा आपल्या यशाचे गमक असल्याचे ते म्हणाले. आज त्या बँकेत विद्यार्थ्यांचे 5 लाख 64 हजार रुपये जमा आहेत. त्यातून या विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, कपडे खरेदीसाठी मदत होते, असे ते म्हणाले. हे उपक्रम पाहून गावातील ग्रामस्थांनी देवळातील दानपेटीच शाळेत आणून ठेवली आहे.