पनवेल

कामोठे भागात रहाणार्या प्रियंका गायकवाड (27) या विवाहितेने पती व सासुच्या छळाला कंटाळुन रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रियंकाच्या पतीने कामोठे येथील रहाते घर विकत घेण्यासाठी बँकेकडून 26 लाखांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडण्यासाठी प्रियंकाने माहेरुन पैसे आणावेत यासाठी तीचा पती भास्कर गायकवाड व सासु रुक्मिणी गायकवाड हे दोघेही तीचा छळ करत होते. अशी तक्रार प्रियंकाच्या आईने केल्याने कामोठे पोलिसांनी  प्रियांकाच्या पतीसह सासु विरोधात छळवणुकीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.  

या घटनेतील मृत प्रियंका हिचा विवाह नोव्हेंबर 2017 मध्ये कामोठे सेक्टर-9 मधील फ्युचर दर्पण सोसायटीत रहाणाऱया भास्कर कृष्णा गायकवाड याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर प्रियंका पुर्वीच्या ठिकाणी नोकरीला जात होती. त्यावेळी तीचा आलेला संपुर्ण पगार तीची सासु रुक्मिणी गायकवाड काढून घेत होती. तसेच तीला खर्चासाठी फक्त मोजके पैसे देत होती. तसेच त्याचा हिशेब देखील ती प्रियंकाकडून घेत होती. त्यादरम्यान, प्रियंकाने दोन महिन्याचा पगार आपल्या खर्चासाठी बँकेत ठेवल्याने तीच्या पतीने व सासुने तीला शिवीगाळ करुन मारहाण केली होती. याबाबतची माहिती तीने आपल्या आईला फोनवरुन दिली होती. त्यानंतर प्रियंका गरोदर राहिल्याने तीने आपली नोकरी सोडून दिली होती. दरम्यान,प्रियंकाच्या पतीने कामोठे येथील घर घेण्यासाठी बँकेकडून 26 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सदरचे कर्ज फेडण्यासाठी प्रियंकाने माहेरुन पैसे आणावेत यासाठी तीचा पती व सासु हे तीला त्रास देत होते. मात्र माहेरची परिस्थीती बेताची असल्याने प्रियंकाने माहेरुन पैसे आणण्यास नकार दिला होता. त्यामुळे पती व सासु तीला मारहाण व शिवीगाळ करुन करत होते. डिसेंबर 2018मध्ये प्रियंका प्रसुतीसाठी आपल्या माहेरी जाताना देखील तीच्या पतीने व सासुने तीच्या आई-वडीलांकडे पैसे नसतील तर शेतीवर कर्ज काढून पैसे घेऊन ये, अन्यथा घरी येऊ नकोस अशी दमदाटी केली होती. प्रियंका माहेरी असताना तीचा पती तीला वांरवार फोन करुन पैशांची जुळवाजुळव झाली का? याबाबत विचारणा करुन तीला पैसे आणण्यासाठी दबाव टाकत असल्याचे प्रियंकाची आई लतिका जगदाळे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. एप्रिल महिन्यात प्रियंकाला मुलगी झाल्यानंतर ती कामोठे येथे आपल्या सासरी  आल्यानंतर देखील प्रियंकाचा पती व सासुकडून तीचा छळ सुरुच राहिला. मागील दोन महिन्यामध्ये प्रियंकाला तिचा नवरा व सासु हे माहेरुन पैसे आणण्यासाठी जास्तच त्रास देऊ लागल्याचे प्रियंकाने आपल्या आईला सांगितले होते. तसेच स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करुन घेण्याबाबत तीने बोलून दाखविले होते. अखेर पती व सासुकडून होणारा छळ असह्य झाल्याने प्रियंकाने बेडरुममधील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर प्रियंकाच्या आईने कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

अवश्य वाचा