पनवेल 

तालुक्यातील भेरले येथील आदिवासी समाजाच्या मूळ जमिनी वाधवा कन्स्ट्रक्शन कंपनीने हडप केल्या आहेत. आदिवासींच्या सुपीक जमिनींना नापीक करणार्‍या या कंपनीविरोधात येथील आदिवासी कुटुंब एकवटले असून त्यांनी प्रजासत्ताक दिनापासून बेमुदत उपोषण आरंभले आहे.

दि. 12 एप्रिल 2019 पासून याबाबत पाठपुरावा करायला सुरुवात केली. मात्र जवळपास 8 महिने उलटूनही शासकीयस्तरावरून याबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही. वाधवा कन्स्ट्रक्शन कंपनीला प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी सुरु असलेल्या उपोषणाच्या कालावधीत जागा हातातून गेल्यामुळे मानसिक संतुलन गमावून एका आदिवासींला जीव गमवावा लागला आहे. तर एक जण कामोठे येथील एमजीएम रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. त्यामुळे आपल्यावर आलेल्या संकटाची गांभीर्याने दखल घेण्यात यावी यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ - 2 चे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्याकडे सदर प्रकरणात वाधवा कंस्ट्रक्शनच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र आद्यपही पोलिसांकडूनही सहकार्य मिळत नसल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.

याबाबत छबीबाई गुरूनाथ वाघमारे, दामु लहान्या कातकरी, कुदा पांडुरंग वाघमारे, भगवान मोतीराम कातकरी, जनार्दन लहान्या कातकरी उर्फ वाघमारे यांनी दिनांक 12 एप्रिल 2019 रोजी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला. त्यानुसार कार्यवाही सुरु करण्यात आली. यावेळी पोयंजे मंडळ अधिकारी यांनी दिनांक 10 ऑक्टोबर 2019 रोजी वाधवा कन्स्ट्रक्शन कंपनीला नोटीस देऊनही कोणतीही माहिती ते देत नसल्याचा अहवाल तहसीलदार पनवेल यांच्याकडे पाठविण्यात आला.

उपोषणाचा इशारा दिल्यानंतर मंडळ अधिकारी पोयंजे यांनी याबाबतचा दुसरा अहवाल दिनांक 13 जानेवारी 2020 रोजी तहसीलदार पनवेल यांच्याकडे पाठविला. यामध्ये स्पष्टपणे आदिवासींवर अन्याय झाल्याचे म्हटले आहे. तरीही अद्याप कारवाई झालेली नाही, याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

 

अवश्य वाचा

हृतिक रोशनने घेतले दर्शन.

शिवभक्तांची रांग.