पाली/बेणसे 

 युवती व महिलांच्या संरक्षणासाठी माजी गृहमंत्री स्व.आर.आर.पाटील यांनी सुरू केलेल्या महिला दक्षता कमिट्या भाजपने बंद केल्या. त्यामुळे मागील पाच वर्षात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. त्यामुळे  माजी मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे दुर्दैवी गृहमंत्री ठरले असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला.

 कोकण  दौर्‍यादरम्यान दि. (27) सोमवारी सुधागड पालीत महिला व युवती कार्यकर्त्यांची भेट घेऊन पक्षवाढी संदर्भात  महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मार्गदर्शन केले.  यावेळी चाकणकर म्हणाल्या की, आता राज्यात महा विकास आघाडीच्या रूपाने जनतेच्या मनातले सरकार सत्तेत विराजमान झाले आहे. युवती व महिलांवरील वाढते अन्याय अत्याचार रोखण्यासाठी   महा विकास आघाडीचे सरकार प्रयत्नशील आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन भाजप सरकारने बंद केलेल्या महिला दक्षता कमिट्या पुन्हा कार्यरत केल्या जाणार आहेत. या कमिट्याच्या माध्यमातून महिला सुरक्षा, धैर्य व आत्मविश्‍वास  देण्याचे काम केले जाणार आहे. युवती व महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महीलांसमवेत स्थानिक बीट मार्शल, दामिनी पथक, पोलिस स्थानक यांच्या माध्यमातून स्थानिक प्रभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निहाय महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणारी यंत्रणा येत्या काळात उभी करणार आहोत.

सामूहिक बलात्कारा च्या घटनांतील पीडित महिलांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना आधार, आत्मबळ व सन्मान देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. महिला सुरक्षित झाल्यास त्यांच्यातील आत्मविश्‍वास वाढेल, राष्ट्रहितार्थं  कामी त्या ताकतीने काम करतील व यातूनच उद्याचा सक्षम व समृद्ध राष्ट्र घडेल   असे  चाकणकर म्हणाल्या. एन.सी.आर., एन.पी.आर व सी. ए.ए संदर्भात आपली भूमिका मांडताना रुपाली चाकण कर म्हणाल्या की आम्ही सारे भारतीय आहोत. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या न्याठक्कासाठी व हितासाठी आम्ही सतत लढा देत राहू असे चाकणकर म्हणाल्या. प्रदेशा अध्यक्ष  रुपाली चाकणकर यांनी यावेळी पालीत बल्लाळेश्‍वराचे दर्शन घेतले. व देवस्थानच्या पदाधिकार्‍यांना आपल्या ट्रस्ट पदाधिकार्‍यांत  महिलांना देखील सामावून घ्यावे असे सूचित केले. यावेळी पेण सुधागड रोहा मतदार संघाच्या अध्यक्ष   गीताताई पालरेचा, माजी सभापती   साक्षीताई दिघे,

सुधागड तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष रमेश साळुंके, पाली शहर अध्यक्ष अभिजित चांदोरकर, सरपंच साधूराम साजेकर, सुधागड तालुका युवक अध्यक्ष संदेश शेवाळे, सुलतान भाई बेणसेकर, सखाराम दिघे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली