पोलादपूर 

तालुक्यातील मोरगिरी गावातील एका महिलेच्या गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला सत्र न्यायालयाने 10 वर्षाची सक्तमजुरी व 30 हजार रुपयांचा दंड ठोठावला असून याप्रकरणी अन्य एका गुन्ह्यांमध्ये 1 वर्षाची सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंड ठोठावला आहे.

पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरगिरी येथे फिर्यादी याच्या घरामध्ये घुसून लहान मुले असल्याचा व फिर्यादी यांची मुलगी गतिमंद असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर आरोपी संतोष सुरेश कळमकर याने बलात्कार केला. दि.25 डिसेंबर 2017 रोजी हा गुन्हा घडला होता.

या घटनेची फिर्याद पोलादपूर पोलिसांनी घेऊन भा.दं.वि. कलम 376 (2) (एल), 354 (ब) आणि 451 अन्वये गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सी.एस. सकपाळ यांनी गुन्ह्याचा तपास केला. आणि माणगाव सत्र न्यायालय मध्ये दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर खटल्याची सुनावणी सुरू झाली. या खटल्यामध्ये सहायक सरकारी वकील जितेंद्र म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्यावतीने साक्षीदार तपासले आणि न्यायालयासमोर प्रभावीपणे युक्तिवाद करून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे न्यायनिर्णय दाखल केले. याकामी पैरवी अधिकारी शशिकांत कासार व महिला पैरवी अधिकारी छाया कोपनर यांनी सहकार्य केले.

या खटल्यात गतिमंद असल्याने पिडीत मुलीचा जबाब नोंदविण्यासाठी विशेष प्रशिक्षित शिक्षकाची मदत घेण्यात आली होती. अभियोग पक्षाने न्यायालयासमोर प्रभावीपणे केलेला युक्तिवाद आणि साक्षीपुराव्यावरून माणगावचे अतिरिक्त सहजिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एम. जहागीरदार यांनी सदर घटनेतील गुन्ह्याच्या शाबीतीनंतर आरोपी संतोष सुरेश कळमकर यास दोषी ठरवून सोमवार, दि. 27 जानेवारी 2020 रोजी भा.दं.वि. कलम 376 अन्वये 10 वर्ष सक्तमजुरी व 30 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 1 वर्ष सक्तमजुरी तसेच भा.दं.वि. कलम 451 अन्वये 1 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 1 महिना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. पोलादपूर तालुक्यातील गतिमंद मुलीवरील बलात्कार प्रकरणी आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली