अलिबाग

बोकडवीरा उरण येथे सुरू असलेल्या 19 वर्षांखालील मुलांच्या रायगड जिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत उरण व अलिबाग संघांनी विजयी सलामी दिली. उरण स्पोर्ट्स असोसिएशन आणि यू.व्ही. पनवेल यांच्यात झालेल्या सामन्यात उरणने 118 धावांनी विजय मिळवला. अलिबागने उरणच्या धीरज क्रिकेट क्लबचा नऊ राखून पराभव केला.

उरण आणि पनवेल यांच्यात झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना उरणने 40 षटाकांमध्ये सर्व गडी गमावून 176 धावा केल्या. साईराज काळे याने 46 तर ॠषिकेश यादवने 29 धावा केल्या. पनवेलच्या विपुल पाटीलने 33 धावांत 4 बळी घेतले. मधुर पांढरे याने दोन गडी बाद केले. पनवेलचा डाव 24.2 षटकांमध्ये 58 धावांमध्ये आटोपला. उरणच्या तनिष्क गावी याने 18 धावांत 3 गडी बाद केले. वरूण म्हात्रे, कृतज्ञ मढवी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. 18 धावा व 2 गडी बाद करणारा कृतज्ञ मढवी सामनावीर ठरला.

अलिबाग क्रिकेट असोसिएशन व धीरज क्रिकेट क्लब यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना धीरज क्रिकेट क्लबचा डाव 17.1 षटकांमध्ये 51 धावांत आटोपला. अलिबागच्या राहुल नवखारकर याने भेदक गोलंदाजी करून अवघ्या तीन धावा देऊन पाच गडी बाद केले. स्वप्नील हिरवे याने दोन बळी घेतले. अलिबागने एक गड्याच्या मोबदल्यात 52 धावा करून हा सामना जिंकला. पाच बळी घेणारा राहुल नवखारकर सामनावीर ठरला.

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन, उरण क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन व दी नाई यांच्या संयुक्त विद्यमान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बोकडविरा येथे खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत 16 संघ सहभागी झाले आहेत. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्योपाध्यक्ष जयंत नाईक व उपाध्यक्ष प्रकाश पावसकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. मनीष टिपणीस, अरविंद राजपूत, जॉनी अ‍ॅनथॉनी, करीट पाटील, प्रशांत माने, सचिन म्हात्रे, समन्वयक सुयोग चौधरी, पंच सुहास हिरवे, सागर काटकर, ॠषिकेश पिंगळसकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उरण स्पोर्ट्सचे किरीट पाटील, प्रशांत माने, सचिन म्हात्रे आणि त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत.

 

अवश्य वाचा

हृतिक रोशनने घेतले दर्शन.

शिवभक्तांची रांग.