राष्ट्रप्रेम ही व्यक्त करण्याची किंवा प्रदर्शन करण्याची बाब नसते. ती कृतीतून सिद्ध करावी लागते. पोलीस आणि लष्करात असणार्‍यांवर तर याबाबत मोठी जबाबदारी असते. तो त्यांच्या कर्तव्याचा भाग असतो; परंतु पैशासाठी इमान विकणारे अनेक असतात. त्यात आता संवेदनशील भागात काम करणारे पोलीस किंवा लष्करातील अधिकारीही असतात, हे वारंवार स्पष्ट होत आहे. काश्मीरमधील पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंग याचं प्रकरण त्यापैकीच आहे.

पाकिस्तानला भारताविरोधात थेट युद्ध करता येत नाही. आतापर्यंत झालेल्या युद्धांमध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे छुपं युद्ध (प्रॉक्सी वॉर) करण्यावर पाकिस्तानचा भर असतो. कधी पैसे तर कधी तरुणींचा वापर करून भारतीय पोलीस आणि लष्करी अधिकार्‍यांना फितवून आपल्याला हवं ते मिळवण्याचा प्रयत्न पाकिस्तानी यंत्रणा करत असतात. मध्यंतरी असाच हनी ट्रॅप रचून भारतीय लष्कराच्या हालचाली समजून घेण्याचा, त्यासंबंधीची कागदपत्रं मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. काश्मीर हे तर अतिशय संवेदनशील राज्य. तिथे पाकिस्तानी तसंच स्थानिक दहशतवाद्यांचा धुमाकूळ चालू असतो. अलीकडच्या काळात तर पाकिस्तानातून थेट येऊन भारतात दहशतवादी कृत्य करण्याऐवजी स्थानिक बंडखोरांना हाताशी धरुन पाकिस्तानकडून भारतात घातपात घडवण्याचा प्रयत्न सुरू असतो. हिजबुल मुजाहिद्दीन ही तर दहशतवाद्यांची कडवी संघटना. बुर्‍हाण वाणी आणि त्याचे दहा साथीदार मारले गेल्यानंतर ही संघटना संपली, असा कितीही दावा केला जात असला तरी या संघटनेचे दहशतवादी अधूनमधून दहशतवादी कृत्यं करत असतात.

स्थानिक दहशतवाद्यांना काश्मीरमधला बंदोबस्त, तिथले पोलीस अधिकारी, लष्करी अधिकार्‍यांची माहिती असते किंवा तशी ती मिळवणं त्यांच्या दृष्टीनं फारसं अवघड नसतं. त्यामुळेच पोलीस आणि लष्करी अधिकार्‍यांना फार सावध राहणं आवश्यक असतं. काश्मीरमधील 370 वं कलम रद्द केल्यापासून पाकिस्तानचं पित्त खवळलं आहे. त्यापूर्वी भारतानं बालाकोटला घडवलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्याची पाकिस्तानची सुप्त इच्छा आहे. ती पूर्ण करता येत नसल्यानं आता दहशतवाद्यांच्या मदतीनं भारतात काही तरी अघटित घडवण्याचा कुटील डाव पाकिस्तान आखत आहे. प्रजासत्ताक दिन जवळ आला असताना असं काही तरी घडवण्यासाठी दहशतवाद्यांनी आखलेल्या कटात राष्ट्रपती पदक विजेता पोलीस अधिकारी सहभागी व्हावा, यासारखं मोठं दुर्दैव नाही. मुळात, आता येत असलेल्या बातम्या पाहिल्या, तर या अधिकार्‍याचे दहशतवाद्यांशी पूर्वीपासून संबंध आहेत आणि पैशासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे स्पष्ट दिसतं. अटक केलेल्यांबाबत बाहेर आलेली माहिती पाहिली तर ही घटना गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे.  

जम्मू-काश्मीरमधल्या कुलगाम इथे दहशतवाद्यांसोबत कारमधून जात असताना अटक करण्यात आलेला पोलीस अधिकारी देविंदर सिंग याच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. ‘दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरहून दिल्लीत आणण्यासाठी 12 लाख रुपये मिळाले होते’ अशी कबुली त्याने दिली आहे. भारतात प्रजासत्ताकदिनी घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता. अटक करण्यात आलेल्या देविंदर सिंग याचं पोलीस विभागातून निलंबन करण्यात आलं आहे. सोबतच लष्करविरोधी कारवाई केल्यानं त्याला देण्यात आलेली सर्व पदकं काढून घेण्यात आली आहेत. आता देविंदर सिंगची गुप्तचर विभाग, रॉ आणि पोलीस अशा सर्व यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे. देविंदरने श्रीनगरमधील आपल्या राहत्या घरात दहशतवाद्यांना राहण्यासाठी जागा दिली होती. त्याच्या घरी छापा मारला असता तीन एके-47 रायफल्स आणि पाच हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले. देविंदर गेली 25 वर्षे पोलीस दलात होता. त्याला आता पोलीस अधीक्षक पदावर बढती मिळणार होती. त्याअगोदरच ही घटना उघडकीस आली आहे. हिज्बुलचा म्होरक्या सय्यद नवीद मुश्ताक याच्यासोबत देविंदर होता. अफजल गुरूशीही या देविंदर सिंगचा संबंध होता. अफजल गुरूनं आपली कार विकत घ्यावी, असा आग्रह सिंग यानं धरला होता. तसंच पाच पाकिस्तानी अतिरेक्यांची व्यवस्था त्यानं केली होता, असा आरोप एका वकिलानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या एका याचिकेत केला होता. अफजल गुरूची सुटका करण्यासाठी सिंग यानं एक लाख रुपयांची मागणी केली होती आणि आपण आपले दागिने विकून हे पैसे दिल्याचा आरोप गुरूची पत्नी तबस्सूम हिनं केला आहे. देशद्रोह्याच्या पत्नीच्या आरोपावर किती विश्‍वास ठेवायचा असा प्रश्‍न उपस्थित होत असला, तरी आता सिंग यानं दिलेली अतिरेक्यांना दिल्लीला आणून सोडण्यासाठी 12 लाख रुपये मिळाल्याची कबुली पाहता पैशासाठी सिंग कुठल्याही थराला जाऊ शकतो, हे स्पष्ट झाल्यानं आता तबस्सूम हिच्या आरोपाचीही चौकशी करायला हरकत नाही. अफजल गुरूला तर फाशी झाली आहे. त्यामुळे त्याची सुटका सिंग कसा करणार होता, त्यासाठी त्याचा काही कट होता का, हे ही आता तपासावं लागेल. पकडण्यात आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांना आधी चंदीगड आणि नंतर दिल्लीला जायचं होतं. या दहशतवाद्यांना सिंग चंदीगड आणि दिल्लीला नेऊन सोडणार होता. दोन अतिरेक्यांसोबत त्याला अटक केल्यानंतर संसद भवनावरील हल्ल्याचा दोषी असलेल्या अफजल गुरूचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अफजल गुरूनं देविंदर सिंगच्या सूचनेनुसार दहशतवाद्यांना दिल्लीत नेलं होतं. अफजल गुरूनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटसोबत प्रशिक्षण घेतलं होतं; मात्र पाकिस्तानकडून भ्रमनिरास झाल्यानंतर त्यानं 1997 मध्ये भारतीय सुरक्षा दलासमोर शरणागती पत्करली होती. त्यानंतरही सुरक्षा यंत्रणेनं अफजल गुरूवर संशयित म्हणून पाळत ठेवली होती. एका हिंसाचाराच्या घटनेनंतर अफझलला अटकही करण्यात आली होती. ही अटक करणार्‍यांमध्ये देविंदर सिंगचाही समावेश होता.

सिंगच्या बढतीची फाइल जम्मू-काश्मीरच्या गृह विभागाकडे प्रलंबित होती. पाकिस्तानमधून येणार्‍या सूचनांचं पालन सिंग करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुलवामातल्या अतिरेकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 42 जवान हुतात्मा झाले. तेव्हा सिंग पुलवामामध्ये पोलीस उपअधीक्षक पदावर होता. त्याची या हल्ल्यात काय भूमिका होती? कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना या हल्ल्यात वापरण्यात आलेलं आरडीएक्स कुणी आणि कुठून आणलं? लष्कराच्या ताफ्यात आरडीएक्सनं भरलेली कार कुठून आली, असे प्रश्‍न आता उपस्थित केले जात आहेत. 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली