सातारा 

सातार्‍यात स्विगी या खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करणार्‍या कंपनीच्या कामगाराने 2017 पासून तब्बल 40 घरफोड्या केल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहेे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) संशयिताला पकडून त्याच्याकडून 20 लाख रुपये किमतीचे सोने, चांदी व महागड्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, वन मॅन शो याप्रकारे पिक्चर स्टाईल घरफोड्या करणार्‍याच्या 

मुसक्या आवळल्याने एलसीबी पथकाचे अभिनंदन होत आहे.

विजय साताप्पा ढोणे (29, सध्या रा. देगाव फाटा, सातारा मूळ रा. बिदर, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. याबाबत अधिक माहिती अशी, की संशयित विजय ढोणे हा गेल्या काही वर्षांपासून सातार्‍यात वास्तव्य करत आहे. सातारा शहरासह उपनगरामध्ये घरफोडींचे सत्र सुरु असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या घरफोड्यांमुळे पोलीस सतर्क झाले असून, एलसीबी पथकही चोरट्यांची माहिती घेत होते. विजय ढोणे याचे नाव समोर आल्यानंतर एलसीबीचे पथक त्याची माहिती काढून त्याच्यावर वॉच ठेवून होते.

एलसीबीच्या पथकाने संशयित विजय ढोणे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची माहिती ऐकून पोलीसही अवाक झाले. संशयित सातार्‍यात गेल्या काही महिन्यांपासून स्विगी या फूड डिलेव्हरी बॉयचे काम पाहात आहे. संशयिताकडे दुचाकी असून, त्याच्याकडे हेल्मेट, डिलेव्हरी बॉयचा गणवेश नेहमी अंगावर असतो. यामुळे त्याच्यावर कोणाचाही संशय येत नव्हता. याचाच तो संशयित गैरफायदा घेत होता. फूड डिलेव्हरी बॉयच्या निमित्ताने तो एरिया, बंगला, अपार्टमेंट हेरायचा. तेथील सर्व माहिती घेतल्यानंतर स्वत: एकटाच घरफोडी करुन डल्ला मारायचा.

2017 पासून संशयित विजय ढोणे सातारा व शाहूपुरी पोलीस ठाण्यांतर्गत परिसरात घरफोडी करीत होता. शहरातील लक्ष्मीनगर, एमआयडीसी, गोडोली यासह ठिकठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. घरफोड्यांमधून चोरट्याने सोने, चांदीचा 16 लाखांचा ऐवज चोरी केला आहे. यामध्ये राणीहार, गंठण, मिनी गंठण, नेकलेस, सोन्याची चेन, कानातील फुले, पैंजण, चांदीच्या देवाच्या मूर्ती यांचा समावेश आहेे.

याशिवाय लॅपटॉप, डिजिटल व रोल कॅमेरा, घड्याळे, आर्टिफिशीअल दागिने असा चार लाख रुपयांचा महागडा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशाप्रकारे 2017 पासून ते जानेवारी 2020 पर्यंत एकूण 40 घरफोड्यांची कबुली दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी खातरजमा केली असता त्यातील 19 घरफोड्याच पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. 21 घरफोड्या दाखल झालेल्या नसून, ज्यांच्या घरफोड्या झाल्या आहेत; परंतु त्यांनी घरफोडी दाखल केली नाही, अशांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.