भारतातील सार्वजनिक सेवासुविधांचा दर्जा सुधारला पाहिजे, पण तो कसा आणि किती वेगाने सुधारू शकतो, याविषयी एकमत होऊ शकत नाही. आपल्या देशाचा विस्तार, लोकसंख्येची घनता, आर्थिक-सामाजिक विषमता, कमकुवत पब्लिक फायनान्स आणि नागरिकांचा मर्यादित सहभाग हे त्याच्या वाटेतले मोठे अडथळे आहेत. असे असूनही अलीकडे त्यासाठी सुरु असलेले प्रयत्न महत्त्वाचे ठरतात.  

 

देशात मध्यमवर्ग वाढला आणि सेवा पुरवठादारांमध्ये स्पर्धा वाढली की सेवांचा दर्जा कसा सुधारत जातो, याची काही सुखद उदाहरणं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. परवा पुण्याहून औरंगाबादला जाताना त्यासंबंधीचा एक वेगळा अनुभव आला. पुणे-औरंगाबाद शिवनेरी बस सुरु होऊन बरीच वर्षे झाली, पण त्या गाड्यांची तिकिटं मिळावीत, यासाठी रांगा लागतात, ही अलीकडची गोष्ट. त्या दिवशीही त्या मार्गावर दोन-तीन एशियाड उभ्या असताना अनेकांनी शिवनेरीसाठीच रांगा लावल्या होत्या. शिवनेरीचे तिकीट महाग होते, हे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचे नव्हते, त्यांना आरामाचा प्रवास करावयाचा होता.

आपल्या देशात अजूनही प्राथमिक सुविधा सर्वांपर्यंत पोचल्या नसल्याने त्यापुढे जाऊन काही दिलेच पाहिजे काय, याचे उत्तर काही दिवसांपूर्वी ‘नाही’ असे होते. पण, आपल्याच समाजातील काही समूहांचे उत्पन्न इतके वाढले आहे की, त्यांना आता वेगळ्या, दर्जेदार, अधिक सुरक्षित सेवा-सुविधा हव्या आहेत. तो रेटा इतका वाढला आहे की, अगदी सरकारी नियंत्रण असलेल्या सेवा पुरवठादारांना या गरजांचा विचार करावा लागत आहे, हे सुचिन्ह होय. या बदलाचा वेग कमी असला तरी ते आपल्या आजूबाजूला दिसू लागले आहेत, हे महत्त्वाचे. अशा सुखसोयी परदेशात पाहायला मिळतात आणि त्याच वेगाने त्या आपल्याकडे आल्या पाहिजेत, अशी अनेकांची अपेक्षा आहे. पण आपल्या देशाचा विस्तार, लोकसंख्येची घनता आणि आर्थिक सामाजिक विषमता, कमकुवत पब्लिक फायनान्स आणि नागरिकांचा त्यातला मर्यादित सहभाग या अडथळयांमुळे हा प्रवास क्रमाक्रमानेच होणार, हे समजून घेतले पाहिजे.

असे हे बदल सर्वत्रच दिसू लागले आहेत. आपण इथे त्याचा फक्त रेल्वे प्रवासाच्या संदर्भात विचार करू या. त्याचे एक वेगळे उदाहरण म्हणजे मुंबईत पश्‍चिम रेल्वेने गेल्या सप्टेंबरपासून केलेला एक प्रयोग. मुंबईत लोकलने दररोज 70 ते 75 लाख प्रवासी प्रवास करतात. हा धबडगा एवढा आहे की ती यंत्रणा चालविणे, हेच मोठे दिव्य आहे. त्यातून वेगळे काही करण्याचे सुचणार तरी कसे? पण, असे काही प्रयोग अलीकडे सुरु झाले आहेत. हा धबडगा एवढा आहे की लोकल मार्गावर मुंबईत दररोज सरासरी आठ ते दहा नागरिक मृत्युमुखी पडतात. मुंबईकर धावत असतात आणि वेळ गाठण्यासाठी ते नको तेथे रूळ ओलांडण्याचे धाडस करतात. पश्‍चिम रेल्वेने अशा काही ठिकाणी ‘यमराजा’च्या पेहरावात सुरक्षा रक्षक ठेवले. ते अशा नागरिकांना रूळाजवळून चक्क उचलून फलाटावर ठेवतात! याचा परिणाम चांगला झाला. मृतांची संख्या सात टक्क्यांनी तर जखमींची संख्या 30 टक्क्यांनी कमी झाली. कोणी म्हणेल, यावर समाधान मानता कामा नये आणि ते बरोबरच आहे. पण त्यासाठी व्यवहार्य असे काय करावे, हे एवढ्या मोठ्या कारभारात सुचले तर पाहिजे! मुंबईच्या धबडग्यात माणसे मरणार, हे आपण गृहीत धरले होते; पण या प्रयोगातून काही जीव वाचविण्याचा प्रयत्न होतो आहे.

आता सुरक्षितता आणि आरामाच्या प्रवासाचे दुसरे उदाहरण पाहू. मुंबईबाहेरचा माणूस मुंबईत लोकलने प्रवास करू शकत नाही, अशी गर्दी असते. तो प्रवास एकदा केला तरी त्यात सुधारणा झाली पाहिजे, असे वाटतेच. पश्‍चिम रेल्वेने अलीकडेच आणलेले ‘उत्तम’ नावाचे रेक हा रेल्वेने त्याला दिलेला प्रतिसाद आहे. या मार्गावर याच वर्षी एसी लोकल सुरु झाली आहे, पण ती सर्वाना परवडेल, असे नाही. ‘उत्तम’ रेक हे काही एसी नाहीत, पण सध्याच्या लोकल डब्यांपेक्षा बरा प्रवास व्हावा, एवढे त्यात पाहिले आहे. उदा. बसण्याचे बाक रुंद आहेत, प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही आहेत. सामान ठेवण्यास अधिक जागा देण्यात आली आहे. मुंबईचा अभिमान वाटावा, अशी छान चित्रंही त्यात लावण्यात आली आहेत. लखनऊचा प्रयोग आणखी वेगळा आहे. फीट इंडिया कार्यक्रमांतर्गत गेल्या ऑक्टोबरमध्ये तेथे हेल्थ एटीएम बसवण्यात आले आहेत. तेथे 50 आणि 100 रुपयांमध्ये प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाते. सध्याच्या धावपळीत आणि वैद्यकीय महागाईत आरोग्य तपासणी सातत्याने टाळली जाते, पण स्टेशनवर नागरिकांना मिळणार्‍या मोकळ्या वेळेत ही महत्त्वाची गोष्ट करता यावी, यासाठी उत्तर रेल्वेने हा पुढाकार घेतला आहे. लखनऊपाठोपाठ गोरखपूर, प्रयागराज, बस्ती आणि गोंदा स्टेशनवर ही सुविधा उपलब्ध केली जात आहे.

गरज जशी सुविधांची आहे, तशीच वेग वाढण्याची आहे. प्रवासात कमीत कमी वेळ जावा, यासाठी जग झटत आहे आणि त्याला भारतही अपवाद नाही. त्यामुळे आपलीही रेल्वे वेगवान करण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. दोन मोठ्या शहरांमध्ये सुरु झालेल्या सुवर्ण शताब्दी, वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेस गाड्या ही त्याची उदाहरणे आहेत. दिल्ली-लखनऊदरम्यानचे 511 किलोमीटर अंतर कापण्यासाठी सुवर्ण शताब्दीला 6.40 तास लागतात तर तेच अंतर तेजस 6.15 तासात कापू लागली आहे. पाच मिनिटे गाडी लेट झाली की जपानमध्ये बातमी होते, असे आपण ऐकले आहे, तेवढा वक्तशीरपणा येण्यास वेळ लागेल, पण आयआरसीटीसीने नव्याने सुरु केलेल्या तेजस एक्स्प्रेसला उशीर झाल्यास तासाप्रमाणे भरपाई देण्यास प्रथमच सुरुवात झाली आहे. प्रत्येक प्रवाशाला 25 लाखांचा अपघात विमा तिकिटासोबत मिळू लागला आहे. भारतीय रेल्वेची आपल्या मनातली प्रतिमा वेगळी आहे. त्यापेक्षा खूप वेगळा, चांगला प्रवास या गाड्या काही मोजक्या शहरात देऊ लागल्या आहेत. रेल्वेला विमान कंपन्यांशी स्पर्धा करावी लागत आहे तर चांगल्या सुविधा आणि वेगवान प्रवास मिळाला तर अधिक भाडं देण्यास भारतीय प्रवासी तयार होत आहेत. प्रवासात सुरक्षिततेला अतिशय महत्त्व आहे. त्याचेही अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळेच दोन गाड्यांची थेट टक्कर झाल्याची एकही घटना 2018-19 मध्ये घडलेली नाही तर डबे घसरण्याच्या घटना 46 पर्यंत रोखण्यात या वर्षी यश आले आहे. त्यापूर्वीच्या वर्षात हेच प्रमाण 78 इतके होते.

वाढत असलेल्या सुविधा आणि त्यासाठी केले जात असलेले प्रयत्न आणि नागरिक म्हणून असलेल्या अपेक्षा, यात अशी दरी कायम राहणार आहे, हाच याचा अर्थ. पण, जगातल्या या अतिशय वेगळ्या देशात हे सर्व एकाच वेळी चालूच राहणार, हे ही आपल्याला मनापासून स्वीकारावे लागणार आहे!

अवश्य वाचा

हृतिक रोशनने घेतले दर्शन.

शिवभक्तांची रांग.