अलिबाग 

रायगड जिल्हाधिकारी म्हणून पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपसचिव डॉ. निधी चौधरी यांची निुयक्ती करण्यात आली असून त्यांनी आज सायंकाळी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाची सुत्रे स्विकारली. यापूर्वी पेण येथे परिविक्षाधीन प्रांताधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

डॉ. विजय सूर्यवंशी यांची पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक या पदावर बदली झाली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी डॉ. निधी चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निधी चौधरी या 2012 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी, मुंबई महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत होत्या. मे 2019 मध्ये महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केल्यामुळे त्या अडचणीत आल्या होत्या. महात्मा गांधी यांचा निधी चौधरी यांनी अवमान केला असून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यानंतर त्यांची पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासन सेवेत येण्यापूर्वी 2008 मध्ये रिझर्व्ह बँकेतही त्यांनी सेवा बजावली आहे. मूळच्या राजस्थानमधल्या नागौर जिल्ह्यातील डीडवानाच्या रहिवासी असणार्‍या चौधरी यांचे जयपूरमध्ये उच्च शिक्षण झाले. राजस्थान विद्यापीठातून त्यांनी लोकप्रशासन या विषयात पी. एचडी संपादन केली. पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे.विकास रथ सावित्रींच्या लेकींच्या हाती

रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, जिल्हाधिकारी डॉ. निधी चौधरी, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौथमल, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी वैशाली माने, प्रांताधिकारी शारदा पोवार, पुर्नवसन उपजिल्हाधिकारी जयमाला मुरुडकर, पेण प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, माणगाव प्रशाली दिघावकर, कर्जत वैशाली परदेशी, भुसंपादन अधिकारी अश्‍विनी सुर्वे-पाटील, प्रतिभा इंगळे, यांच्यासह पेण, मुरुड, उरण, कर्जत, खोपोली, माथेरान, खोपोली, महाड, या नगरपालिकेचे नगराध्यक्षपदी महिला असल्याने आता रायगडच्या विकासाचा रथ महिलांच्या हाती आला आहे. हा विकास रथ या सावित्रीच्या लेकी जोमाने हाकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.