पंढरपूर 

गेली 10 वर्षे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सत्तेवर असणार्‍या संचालक मंडळाने भ्रष्ट कारभार करून कारखान्याचे दिवाळे काढले. आणि दिवाळखोरीचे खापरं भाजप सरकार आणि कारखाना कर्मचार्‍यांच्या डोक्यावर फोडले. कारखाना रसातळाला घालवणार्‍या या संचालक मंडळाच्या मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी व्हावी अशी मागणी कै. माजी आमदार औदुंबरअण्णा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमरजित पाटील यांनी केली. ते पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी कारखान्याच्या विद्यमान प्रशासनावर त्यांनी जोरदार हल्ला चढविला.

साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामात विठ्ठल सहकारी साखर कारखाना  गाळप करू शकला नाही. सन 2019/20 या गळीत हंगामात कारखाना सुरू न करण्याचा निर्णय विद्यमान संचालक मंडळाने घेतला. आर्थिक अडचणीत आल्याने हा निर्णय घेताना मागील सरकारच्या कारखानाविरोधी धोरणांचा उल्लेख करीत कारखान्याच्या कामगारांनाही अपराधी ठरवण्यात आले. गेल्या दहा वर्षापासून सत्तेवर असलेल्या कारखान्याच्या चेअरमन आणि संचालक मंडळाने केलेल्या भ्रष्ट कारभारामुळे विठ्ठल कारखान्यावर कारखाना बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली. सन 2018/19 या गळीत हंगामातील सभासदांची ऊस बिले तसेच कर्मचार्‍यांचा नऊ महिन्यापासूनचा पगार आणि कर्मचार्‍यांची इतर देणी कारखाना आजतागायत देऊ शकला नाही. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास दिवाळखोरीत लोटणार्‍या या भ्रष्ट संचालक मंडळाच्या खासगी मालमत्तांची तसेच त्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अमरजीत पाटील यांनी शासनाकडे केली आहे.

शेतकर्‍यांची देणी आणि कामगारांची देणी या संचालक मंडळाच्या मालमत्तांची विक्री करून भागवण्यात यावी, आणि या कारखान्यावर आयएएस दर्जाच्या प्रशासकाची नियुक्ती करावी अशीही मागणी पाटील यांनी यावेळी केली

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग