मुंबई

राज्यातील शाळांमध्ये आता वॉटर बेल उपक्रम राबवण्यात येणार आहे. मुलं शाळेत दिवसातील 5 ते 7 तास असतात. या काळात त्यांना दीड ते दोन लीटर पाणी पिणं आवश्यक असते. मात्र, मुलांना पाणी पिण्याची सवय नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची सवय लागावी म्हणून शाळेच्या वेळापत्रकात आता तीन वेळा वॉटर बेल वाजवण्याची वेळनिश्‍चिती करण्यात येणार आहे. तसे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून सर्व शाळांना देण्यात आले आहेत.

शाळेतील अनेक विद्यार्थी घरातून  नेलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या अनेकदा तशाच घरी आणतात आणि दिवसभरात शाळेत खूप कमी पाणी अनेक विद्यार्थी पीत असल्याचं निदर्शनास आले. तेव्हा शाळेमध्ये पाणी पिण्याची आठवण करुन देण्यासाठी शाळेच्या वेळापत्रकातच तीन वेळा वॉटर बेल वाजवण्याची वेळनिश्‍चिती केली जाणार आहे. सोबतच या उपक्रमाचा अहवाल शालेय शिक्षण आयुक्तांनी राज्यातील सर्व शाळांकडून घ्यावा जेणेकरुन या उपक्रमाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही हे कळेल.

वजन, उंची, वयानुसार मुलांनी रोज दीड ते दोन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. मुलांचा दिवसातील पाच ते सात तासांचा कालावधी शाळेत जातो. या कालावधीत शरीराला पाण्याची अनेकदा गरज असूनही अभ्यास, खेळ यामुळे अनेक विद्यार्थी पाणीच पित नाहीत. अनेक लहान मुले सकाळी घरातून नेलेले पाणी पुन्हा घरी घेऊन येतात. आपली मुले शाळेत पाणी पीत नसल्याच्या अनेक तक्रारी पालक नेहमी करत असल्याचे अनेक सर्वेक्षणातूनही समोर आले आहे.

मुख्याध्यापकांनी   शाळेच्या   वेळापत्रकात वॉटर बेलसाठी वेळनिश्‍चिती केल्यानंतर पाणी पिण्याची मुलांची मानसिकता आपोआपच निर्माण होईल आणि पुढे तिचं सवयीत रुपांतरही होईल. अनेकदा वर्ग सुरु झाल्यानंतर शिक्षक स्वच्छतागृहात पाठवत नसल्याने विद्यार्थी पाणी पित नसल्याचे समोर आलं आहे.

या कारणास्तव या वेळांमध्ये शाळांनी मुलांना स्वच्छतागृहे वापरण्याचीही मुभा द्यावी, असे परिपत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा भरण्याची आणि सुटण्याची सूचना देणारी घंटा आता विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करुन देण्यासाठीही वाजवण्यात येणार आहे.

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.