अलिबाग 

थळ येथील राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅन्ड फर्टिलायझर्स (आरसीएफ) कारखान्याच्या अग्निशामक वाहनाच्या होस पाईपची चोरी झाल्याची घटना काही दिवसांपापूर्वी कारखान्यात घडली. मात्र चोरी करणारा कर्मचारी स्थानिक आमदाराच्या हितसंबंधातला असल्याने यासंबंधी गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यास जोरदार दबाव आणण्यात आल्याने आरसीएफ व्यवस्थापनाने हातावर हात आणि तोंडावर बोट ठेवल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या चोरीमळे आरसीएफचे लाखोंचे नुकसान झाले आहेच त्यात हे साहित्य हे अग्निशमन वाहनाचे महत्वाचा भाग असून ते सहजासहजी उपलब्ध होत नाही. त्यामुळे जर वेळीच हे साहित्य उपलब्ध झाले नाही तर अग्निशमन यंत्रणा निरुपयोगी ठरेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

ही चोरी करणारी व्यक्ती आरसीएफ कारखान्यााशी संबंधीत एका मोठया नेत्याचा नातेवाईक असल्याने ही घटना दडपण्यासाठी स्थानिक आमदारासह अनेकजण दबाव आणीत आहेत. आरसीएफ कारखान्यामध्ये अग्निशमन वाहनाच्या पाईपला लावण्यात येणारे होस पाईप हा महत्वाचा भाग मानला जातो. तो कुठेही सहजासहजी उपलब्ध होत नाही. दक्षता म्हणून अशा प्रकारचे भाग अतिरिक्त ठेवले जातात. काही दिवसांपूर्वी स्टॉक मधून सुमारे 11 होस पाईप गायब झाल्याचे संबंधीत अधिकार्‍याच्या निदर्शनास आले. याबाबतची चौकशी केली असता त्याच काही थांगपत्ता लागला नाही. शेवटी त्या विभागामध्ये असलेल्या सीसीटिव्ही फुटेजचा आधार घेऊन पाहणी करण्यात आली असता. एक कर्मचारी संबंधीत साहित्य नेत असल्याचे निदर्शनास आले. त्यावर या अधिकार्‍याने त्या कर्मचार्‍याला बोलावून याविषयी विचारणा केली असता सुरुवातीला त्याने नकारघंटा वाजवली. मात्र सीसीटिव्ही फुटेजमध्ये सपशेलपणे आपली हातचलाखी त्या अधिकार्‍याने दाखविताच पोपटासारखा घडाघडा बोलून आपल्या कृत्याची कबूली याने दिली. त्यावर ते कुठे असतील तीथून घेऊन येण्याचे आदेश दिले असता. आपल्या मौजमजेसाठी भंगारमध्ये ते कवडीमोलात विकल्याची कबूली या कर्मचार्‍याने दिली. सदर भंगारवाल्याकडून ते परत आणणे मात्र त्याला शक्य झाले नाही. त्यामुळे व्यवस्थापनाने याबाबतीत कारवाई करण्याची तयारी सुरु केली. मात्र तो कर्मचारी स्थानिक आमदाराच्या बगलबच्च्यांपैकीच एक असल्याने या आमदाराने आपल्या कार्यकर्त्याला वाचविण्यासाठी आरसीएफ व्यवस्थापनावर दबाव आणीत कारवाई न करण्यासंबंधी बजावले. त्यामुळे या दबावापुढे झुकून व्यवस्थापनाने कारवाई करण्याचे टाळले असल्याचे वृत्त आहे.

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग