अलिबाग

लायन्स क्लबतर्फे 24 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान अलिबाग समुद्र किनारा येथे लायन्स अलिबाग फेस्टिव्हल आयोजित केला आहे. फेस्टिव्हलचे हे चौदावे वर्ष असून याही वेळी नाविण्यपूर्ण उत्पादनांचे स्टॉल्स, मनोरंजन कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लायन्स क्लबचे अध्यक्ष रमेश धूावडे, फेस्टीव्हल कमिटीचे अध्यक्ष संजय पाटील व उपाध्यक्ष श्रीकांत ओसवाल यांनी ही माहिती दिली.

 लायन्स अलिबाग फेस्टिव्हलचे उद्घाटन राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. फेस्टिव्हल दरम्यान खासदार सुनील तटकरे, आदी मान्यवर भेटी देतील. फेस्टिव्हलची सांगता खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीने होणार आहे. अलिबागचे एक वैशिष्ट्य असलेल्या प्राचीन बालाजी मंदिराच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती फेस्टीव्हलमध्ये साकारण्यात येणार आहे.

जागतिक बाजारपेठेमध्ये नामांकित ब्रँड असलेल्या मीनल मोहाडिकर यांच्या कन्झुमर शॉपी या संस्थेबरोबर कार्यक्रमाचे संयोजन असून फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारचे सुमारे दोनशे स्टॉल्स द्वारे विविध नाविण्यपूर्ण उत्पादने येथे असणार आहेत. सामाजिक उपक्रम म्हणून फेस्टिव्हल दरम्यान पाच दिवस मोफत डोळे तपासणी आणि त्यानंतर अल्पदरात शस्त्रक्रियांचे प्रयोजन करण्यात आले आहे. मनोरंजन विभागात जोडी कमाल की, कराओके सिंगींग स्पर्धा, आदी कार्यक्रम होणार आहेत. एक टन वजनाचा सहा फुट उंच आणि 14 फुट लांब महाकाय बैल हे यावेळी विशेष आकर्षण असणार आहे. अलिबाग परिसरातील देहदान आणि नेत्रदान केलेल्या परिवारांचा सन्मानही फेस्टिव्हलमध्ये होणार आहे.

फेस्टिव्हलच्या माध्यमातून मिळणार्‍या निधीचा विनियोग विविध सामाजिक उपक्रमांसाठी केला जात आहे. या निधीच्या माध्यमातून गरीब व गरजूंवर आतापर्यंत चार हजार नेत्र शस्त्रक्रिया केल्या आहेत, अशी माहिती फेस्टिव्हल अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली. या पत्रकार परिषदेस अलिबाग लायन्स क्लबचे अध्यक्ष रमेश धनावडे, अनिल जाधव, अ‍ॅड. शिरिष लेले, संजय कर्वे, प्रवीण सरनाईक, महेंद्र पाटील, नयन कवळे, नितीन अधिकारी, संतोष वझे, संतोष पाटील, अनिल म्हात्रे, भगवान मालपाणी आदी सदस्य उपस्थित होते.

 

अवश्य वाचा

माथेरानच्या पायथ्याशी वणवा