पनवेल 

 महावितरणची वीजवाहक वाहिनी बदलण्याच्या कामाला उशीर झाल्यामुळे रखडलेल्या पनवेलहून पोदीला जोडणार्‍या भुयारी मार्गाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. प्रजासत्ताक दिनी भुयारी मार्ग सुरू होण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. मंगळवारी पनवेल प्रवासी संघाच्या पदाधिकार्‍यांनी या मार्गाच्या कामाची पाहणी केली.

नवीन पनवेल पश्‍चिमेला जोडणार्‍या भुयारी मार्गाचे रखडलेले काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये भुयारी मार्गाचे सुरू झालेले काम पूर्ण होण्यास दोन वर्षांपेक्षा अधिक काळ जावा लागला. मात्र आता पोदीवरील फाटकासमोर ताटकळत उभे राहण्याची गरज आता काही दिवसांत संपणार आहे. मे 2018 म्हणजेच काम सुरू झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच भुयारी मार्ग सुरू होणे अपेक्षित होते. मात्र सरकारी कामातील दिरंगाई या भुयारी मार्गासाठीही टळू शकली नाही.

नवीन पनवेल सेक्टर 15, 16, तसेच पोदी आणि विचुंबे गावात पनवेल बाजूकडून जाण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकाजवळील पोदी फाटकावर फाटक उघडल्याशिवाय जाता येत नाही. त्यामुळे या भागातही भुयारी मार्ग अथवा उड्डाणपुलाची गरज भासू लागली होती. विसपुते, पिल्लई कॉलेजातील विद्यार्थ्यांना या फाटकात वेळ वाया जात होता. नागरिकांच्या वेळेची आणि इंधनाची बचत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला होता. नोव्हेंबर 2017मध्ये काम सुरू झाले आणि महिनाभरात काम बंद पडले होते.

पनवेल प्रवासी संघ यांनी पाठपुरावा केल्यानंतर गतवर्षी पुन्हा कामाला सुरुवात झाली. महावितरणने त्यांची जबाबदारी असलेले वीजवाहक खांब हटविण्यास विलंब केल्यामुळे हे काम रखडल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जात होते. पदाधिकार्‍यांच्या पाठपुराव्यामुळे भुयारी तयार सिमेंट ब्लॉक टाकून पूर्ण करण्यात आला. उर्वरित कामेदेखील पूर्ण करण्यात आली असून भुयारी मार्ग सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पनवेल प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ. भक्तीकुमार दवे यांनी पदाधिकार्‍यांसह पाहणी केली. 25 किंवा 26 जानेवारी रोजी भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्‍वासन रेल्वेकडून दिल्याची माहिती दवे यांनी ममटाफशी बोलताना दिली. त्यामुळे नव्या वर्षात फाटकावर वाट पाहण्याचा प्रश्‍न कायमचा मिटेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सिडकोवर नाराजी

पनवेल आणि पोदी, विचुंबेला जोडणार्‍या नव्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले तरी नवीन पनवेल बाजूकडील भुयारी मार्गाला जोडणार्‍या रस्त्याची अवस्था कठीण आहे. सिडकोच्या अधिकार्‍यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी रस्ता तयार केला नाही. त्यामुळे भुयारी मार्गातून जाणार्‍या प्रवाशांना नवीन पनवेल बाजूकडील सुमारे 400 मीटर प्रवास खडतर रस्त्यावरून करावा लागणार आहे. सोमवारी केलेल्या पाहणीत प्रवासी संघ आणि रेल्वे प्रशासनाने सिडकोच्या ढिम्म कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.