1963 वर्ष होतं ते, सप्टेंबर महिना. एक विशीतील तरुणी आपली नोकरी करुन साठवलेली सर्व रक्कम जमा करते, बँकेकडून तीन वर्षांत परतफेडीच्या बोलीवर कर्जाऊ रक्कम घेते आणि एक दिवस केनिया नैरोबी विमानतळावर उतरते. अगोदरच पत्रव्यवहार करुन तिने लँडरोव्हर गाडी आणि जॉन अलेक्झांडर नावाचा ब्रिटिश तरुण मार्गदर्शक म्हणून ठरवलेला असतो. तिने आयुष्यभर उराशी एक स्वप्न बाळगलेलं असतं. केनियास्थित जगातल्या सर्वात मोठ्या त्साओ राष्ट्रीय उद्यान, टांझानियातलं मन्यारा सरोवर, गोरोंगोरोचं ज्वालामुखी विवर, त्या शेजारील ओल्डुवाई गॉर्जचा उत्खननाचा भूभाग, कांगो (त्या वेळचा झैरे)मधलं मिकेनो पर्वतीय जंगल आणि झिंबाब्वे (त्यावेळचा र्‍होडेशिया)मध्ये तिला मनसोक्त भटकायचं होतं. मन्यारा सरोवरातले अथांग, अगणित फ्लेमिंगोंचे थवे तिने बघितले, त्साओ राष्ट्रीय उद्यानात असंख्य हत्ती, जिराफ, सिंह तिने अनुभवले, गोरोंगोरो विवरातली प्रतिसृष्टीची नवलाई तिने बघितली.

दरम्यान, ओल्डुवाई गॉर्जमधे भू-उत्खनन करणारे प्रख्यात मानववंशशास्त्रज्ञ डॉ. लुईस लिके तिला भेटले. तिने त्यांची संशोधन पद्धत बघितली. ती खूपच प्रभावित झाली. त्यांनी तिला ‘जेन गुडाल’ची कथा सांगितली. तीन वर्षांपूर्वीच जेन गोम्बे येथे चिम्पांझीच्या अभ्यासाठी गेली होती. ती भारावलेल्या मन:स्थितीमधेच पुढे युगांडातल्या विरुंगा पर्वतातल्या एका ‘ट्रॅव्हलर्स नेस्ट’ हॉटेल भागामध्ये गेली. तिथे तिला माऊंटन गोरीला बघायचे होते. बरेच दिवस तिला तपश्‍चर्या करावी लागली. आणि 26 ऑक्टोबर 1963 रोजी तिने अ‍ॅलन व जॉर्ज रुट या प्रकाशचित्रकार मार्गदर्शकांसोबत त्या गोरिलांचं प्रथम दर्शन घेतलं. त्याच क्षणी तिची स्वप्नकथा पूर्ण झाली होती, पण विधीलिखित वेगळंच होतं. स्वप्न पूर्ण झालं, पण एका भविष्यकालीन विलक्षण सत्यकथेचा जन्म झाला होता. आणि त्या रोमांचकारी पण दु:खद अंत असलेल्या सत्यकथेची नायिका होती ‘डायन फॉसी’...

16 जानेवारी 1932 रोजी कॅलिफोर्नियात सॅनफान्सिस्कोमध्ये जन्मलेली ‘डायन’ आईबरोबर श्रीमंत पण सावत्र वडिलांच्या घरामधे सुखाने वाढत होती. 1954 मध्ये व्यावसायिक शिक्षणामध्ये पदवी प्राप्त करतेवेळी ती अश्‍वारोहणासारख्या साहसी खेळामध्ये प्रवीण झाली होती. पाळीव प्राणी आणि खासगी प्राणीसंग्रहालयांमध्ये ती रमत होती. केंटुकी गावातल्या कोसारा बाल रुग्णालयामध्ये ती नोकरी करु लागली. 1963 च्या आफ्रिकन सफारीमध्ये माऊंटन गोरीलाच्या प्रथम दर्शनाने ती खूपच संमोहीत झाली होती. 1966 च्या वसंत ॠतूमध्ये डॉ. लुईस लिके यांचं भाषण अमेरिकेत लुइसव्हिले इथे आयोजित केलं होतं. डायन आवर्जून तिथे गेली. भाषणानंतर ती डॉ. लुईस यांना भेटली. डॉ. लुईस हे द्रष्टे व रत्नपारखी होतेच, त्यांनी तिच्या डोळ्यातलं स्वप्नाला सत्यात उतरवण्याचं पाहताक्षणीच नक्की केलं. गोरीलांच्या अभ्यासासाठी कुणी तरी त्यांचा विश्‍वास संपादन करुन, त्यांच्यापैकीच एकजण बनून, अनेक वर्षे त्यांच्यामध्ये राहायला हवं, असं आग्रहाचं आर्जव डॉ. लुईस यांनी तिला केलं. अर्थात, तिचा निश्‍चय अबाधित होताच. तिने काही महिन्यातच आपल्या डोक्यावरील कर्ज फेडून टाकलं. ‘इंग्रजी स्वाहिली’ भाषेची पुस्तकं विकत घेतली. डॉ. जॉर्ज शेल्लर यांची पुस्तकं वाचली. त्याशिवाय आणखी एक गंमतीची गोष्ट तिला करावी लागली. ती म्हणजे, डॉ. लुईस यांनी तिला अ‍ॅपेंडिक्स काढून टाकण्याची शस्त्रकिया करुन घेण्यास सांगितलं होतं. आश्‍चर्याची बाब म्हणजे, तिने ती त्या काळात कोणताही त्रास नसताना स्वत:वर ही शस्त्रक्रिया करुन घेतली! अर्थात, केवळ खूप वर्षे आफ्रिकेत राहण्याचा तिचा निश्‍चय खराच आहे, की उत्साहाच्या भरातला, हे कळण्यासाठी मी तसे बोलून गेलो, असं डॉ. लुईस म्हणतात!

आपले नातेवाईक आणि पाळलेली कुत्री, मांजरं यांचा जड अंत:करणाने निरोप घेऊन डायन 1966 च्या डिसेंबर महिन्यामध्ये केनियात नैरोबी शहरात दाखल झाली. सर्वप्रथम तिने गोम्बे इथे ‘जेन गुडाल’ची भेट घेतली. तिचं कार्य, तिथली आव्हानं समजून घेतली आणि टांगानिका सरोवराच्या पलिकडील रवांडा-युगांडा-झैरे (कांगो)च्या सीमेवरील ‘काबारा’ या विरुंगा पर्वत रांगातल्या घनदाट जंगलात येऊन स्थिरावली. ‘काबारा’ इथे तंबू उभारुन उत्साहाने जंगलात इकडे तिकडे भटकताना पहिल्या दहा मिनिटांतच तिला एका धिप्पाड गोरिला नराने दर्शन दिलं. तिच्या दृष्टीने हा मोठा शुभशकुन होता. सात बाय दहा फुटाचा तंबू म्हणजे तिची प्रयोगशाळा. तिथेच लेखन स्वयंपाक, झोपणं, कपडे वाळवणं वगैरे सर्व चालायचं. महिन्यातून एक वेळ डोंगर खाली उतरुन, तिला आवडत्या ‘लिली’ या लँडरोव्हरमधून जेवणखाण्याचे महिन्याचं सामान आणावं लागायचं! माऊंट मिकेनोच्या त्या डोंगरउतारावरील जंगलातल्या गोरीलांच्या टोळ्यांना ती ओळखू लागली. त्यांच्या चेहर्‍यावरुन, नाकाच्या ठेवणीवरुन ती व्यक्तिश: प्रत्येक सदस्याला वेगळं नाव ठेवूून ती नुसत्या दुर्बिणीतून दूरवरुन बघू लागली. टिपणं काढू लागली. हत्तींचे जसे कान, माणसाचे जसे बोटांचे ठसे, तशी गोरिलांची नाकाची ठेवण असते.

9 जुलै 1967 रोजी डायन आणि तिच्या सहाय्यक सॅनवेकेबरोबर डोंगरावरुन कॅम्पकडे परतली, त्यावेळी झैरेचे मिल्ट्री सैनिक तिचीच वाट पाहात होते. त्यांनी तिला लगेच कैद करुन जवळच्याच रुमानगॅबो गावात नेलं. कांगोच्या किऊ प्रांतामधे मोठी बंडाळी माजली होती. दोन आठवड्यांच्या धडपडीनंतर ती त्या सैनिकांचं मन वळवण्यात यशस्वी झाली आणि युगांडामधल्या ‘किसोरो’ गावात पोहोचली.

याच परिसरामध्ये तिला रोझामाँड कार आणि अल्मेंट डिमंड नावाच्या दोन मैत्रिणी मिळाल्या, पैकी अल्मेंट डिमंडने डायनच्या अकाली मृत्यूनंतरही तिचं कार्य पुढे चालू ठेवलं. 24 सप्टेंबर 1967 रोजी डायनने याच परिसरामध्ये ‘कॅरीसोके’ संशोधन संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. पर्वतीय गोरीलांचं संरक्षण, निरीक्षण आणि संवर्धन या त्रिसूत्रीवर तिचं काम सुरु होतं. गोरीलांच्या आठ टोळींचा समूह तिने निश्‍चित केला. त्या समूहांना, त्यांच्या नेत्यांना नावं दिली. त्यांच्या फिरण्याच्या जागा निश्‍चित केल्या, त्यांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी ती रांगत-रांगत त्या जंगलात भटकू लागली. दोन पायांवर उभं राहणं म्हणजे आक्रमक होणं, असं गोरिला समजतात. जॉर्ज शेल्लरने सांगितलेली मार्गदर्शक तत्त्वं डायन संपूर्णपणे पाळत होती. त्यामुळेच ती गोरिलांच्या समूहामधे पूर्णपणे मिसळून जाऊ शकली. पुढे 1968 मध्ये ‘नॅशनल जिओग्राफी’ने बॉब कॅम्पबेल नावाचा एक तरुण प्रकाशचित्रकार कॅरीसोके इथे पाठवला. सुरुवातीला गोरिला निरीक्षणात डायनला बॉबची अडचण वाटत होती; परंतु पुढे पुढे त्यांची घट्ट मैत्री झाली.

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.