2019 या वर्षात तंत्रज्ञान उद्योगाच्या अर्थकारणाने मोठी भरारी घेतली. एव्हाना हे क्षेत्र उद्योगजगतात अनेक नव्या संकल्पना रुजवत आहे. या घडामोडी समजून घेणं आणि त्यामागील अर्थविचार तपासणं, हाच आज एक वेगळा अनुभव ठरत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या क्षेत्राने अनेक लक्षवेधी व्यावसायिक गणितं जन्माला घातली. त्यातून काही प्रवाह समोर आले. त्याविषयी आणि या वर्षातल्या एकूणच तंत्रज्ञान व्यवसायांच्या वाटचालीविषयी... 

गेल्या वर्षभरात तंत्रज्ञान उद्योगात काही नवे प्रवाह आले आणि काही बदलही घडले. हे बदल विशेषतः अर्थकारणात घडले होते. झोमॅटोसारख्या मोठ्या कंपन्यांपासून मध्यम टप्प्याच्या कंपन्यांपर्यंत अनेक कंपन्या नवीन आणि आधीपासून असलेल्या अधिकार्‍यांना सहसंस्थापकाचं बिरुद चिकटवताना दिसत आहेत. यामध्ये ऑनलाईन औषधक्षेत्रात डिलीव्हरीचं काम करणार्‍या मेडलाईफपासून मांसाच्या डिलीव्हरीचं काम करणार्‍या लिसियसपर्यंत विविध कंपन्यांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, गौरव गुप्ता आणि अनंत नारायणन या दोघांनी अनुक्रमे झोमॅटो आणि मेडलाईफमध्ये प्रवेश केला, त्यावेळी कंपन्या सुरू होऊन बरीच वर्षे उलटून गेली होती. मात्र, तरीही त्यांना सहसंस्थापक असंच म्हटलं गेलं. नेहमीच्या संकल्पनेप्रमाणे कंपन्यांची स्थापना करणारे सहसंस्थापक असतात; परंतु इथे हा पायंडा पूर्णतः बदलल्याचं दिसतं.

हे धोरण का आखलं गेलं असावं, याबाबत विविध कारणं सांगितली जात असली तरी या क्षेत्रात निर्माण झालेली वाढती स्पर्धा हेच यामागचं खरं कारण आहे. या व्यूहरचनेमुळे अधिकार्‍यांचं आणि ऑपरेटर्सचं महत्त्व अधोरेखित होत असून, स्टार्ट अप कंपन्यांमधल्या या पदांमुळे संबंधित नवीन कर्मचार्‍यांनाही ग्राहकांशी व्यवहार करताना आत्मविश्‍वासानं वावरता येतं आणि ग्राहकही सहसंस्थापकांशी व्यवहार करत असल्यानं व्यवहारांची अधिक खात्री वाटून झटपट व्यवहाराला तयार होतात. मात्र, आता ही बाब गुप्त राहिलेली नाही. कारण हा अलीकडचा प्रवाह नाही. 2006 पासून तो सुरू आहे. त्यामुळे अनुभवी आणि जाणते ग्राहक आता या युक्तीला फारसे फसत नसल्याचंही दिसत आहे. ‘मेक माय ट्रीप’च्या दीप कालरा यांनी ‘द इंडिया’चे सीईओ राजेश मॅगो यांना हा दर्जा दिला होता. पण, आज या दृष्टिकोनाला मोठंच महत्त्व आलं आहे. भारतीय इंटरनेटची बाजारपेठ अधिक स्पर्धात्मक बनत चालल्यामुळे कंपन्यांना त्या प्रत्यक्षात चालवणार्‍या ऑपरेटर्सची मोठीच गरज आहे.

अलीकडच्या काळात फेसबुक आणि गूगल यांच्यासारख्या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांना अमेरिकेत नियामकांकडून, लोकप्रतिनिधींकडून आणि कर्मचार्‍यांकडून केल्या जाणार्‍या अधिक काटेकोर परीक्षणाला आणि विश्‍लेषणाला तोंड द्यावं लागलं. भारतातही मोठ्या डिजिटल कंपन्यांना नकारात्मक प्रतिसादाला तोंड द्यावं लागलं. यात ऑनलाईन किरकोळ विक्रीच्या कायद्यांमध्ये झालेल्या बदलांचा, अन्नाची डिलीव्हरी करणार्‍या कंपन्यांच्या विरोधात व्यक्त करण्यात आलेल्या प्रतिकूल मतांचा आणि काही वेळा त्यांच्या निषेधाचाही समावेश आहे. माहितीच्या खासगीपणाच्या हक्काचं विधेयकही यातच मोडतं. माहितीच्या स्थानिकीकरणावरुन भारत सरकार आणि उद्योग यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. पेमेंट्स व्यवसायांमधल्या फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवेशानं महत्त्वाचा लढा सुरू झाला होता.

मूल्यनिर्धारणाचा गाजावाजा आणि त्या तुलनेत झालेली प्रचंड घसरण आणि त्यानंतर अतिशय अवमूल्यित दरानं करावी लागलेली कंपनीची विक्री हा या कंपन्यांच्या बाबतीतला आणखी एक प्रवाह अलीकडे दिसून येत आहे. कंपन्या अब्जावधी डॉलर्सच्या मूल्याचा असणं याचा अर्थ त्या यशस्वी होतीलच असा नाही, हे अलीकडे स्पष्ट झालं. 2016 मध्ये 1.1 अब्ज डॉलर किंमत असलेल्या शॉपक्ल्यूजची दहा कोटी डॉलर्सहून कमी किंमतीला विक्री झाली. सिंगापूरमधील ई-टेलर क्रू 0010 नं. नोव्हेंबरमध्ये त्याची खरेदी केली. सिंगापूरच्या जीआयसी, टायगर ग्लोबल, हेलिऑन व्हेंचर पार्टनर्स आणि नेक्सस व्हेंचर पार्टनर्सकडून मिळालेल्या निधीवर 25 कोटी 70 लाख डॉलरहून अधिक पैशावर शॉपक्ल्यूजची उभारणी झाली होती. मात्र, त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. त्यात त्याच्या संस्थापकांमध्येच संघर्ष झाला. शिवाय फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अ‍ॅमेझॉन आणि पेटीएम मॉल यांच्याकडून झालेल्या प्रचंड स्पर्धेला तोंड द्यावं लागलं. भारतातल्या अनेक स्टार्ट अप्सना अशाच प्रकारे दिवाळं निघालेल्या अवस्थेत गाशा गुंडाळावा लागला. स्थापनेसाठी आलेल्या खर्चाएवढी रक्कमही त्यांना मिळू शकली नाही. भारतीय बाजारपेठेतल्या जबाँग आणि फ्रीचार्ज यांचीही त्यांच्या मूल्यनिर्धारणाहून खूपच कमी किंमतीला विक्री झाली.

या घडामोडींमध्ये ओयोची उलाढाल मात्र डोळे दिपवणारी ठरली. सॉफ्ट बँकेच्या पाठिंब्यावर उभ्या असलेल्या ओयो हॉटेल्स अँड होम्ससाठी 2018 मध्ये बरेच चढ-उतार पाहावे लागले. मात्र, त्यांनी जगभर अगदी आक्रमकपणे विस्तार केला. त्यातही संस्थापक रितेश अगरवाल यांनी दोन अब्ज डॉलरचं कर्ज घेऊन आपले शेअर 30 टक्क्यांपर्यंत वाढवले आणि भांडवलातही चांगलीच वाढ केली. त्यांची ही खेळी अत्यंत धाडसी ठरली. कंपनीने दहा अब्ज डॉलर्स किंमतीचा व्यवहार केला. गेल्या वर्षीच्या ओयोच्या मूल्यनिर्धारणाच्या तुलनेत ही किंमत दुपटीनं जास्त होती. कंपनीनं युरोपमध्ये विस्तार केलाच; शिवाय अमेरिकेत 200 मालमत्तांचे व्यवहार केले. त्यांनी लास व्हेगासमधील हूटर्स हॉटेल अँड कॅसिनो खरेदी केलं. मात्र, गेल्या वर्षीची अखेरची सहामाही त्यांच्यासाठी प्रतिकूल होती. भारतात आणि चीनमधल्या हॉटेलमालकांच्या बंडाला त्यांना तोंड द्यावं लागलं. अलीकडेच ओयोनं 500 कर्मचार्‍यांची तात्पुरती कपात केली.

2019 मध्ये शहरी भागात वाहतुकीच्या क्षेत्रात काम करणार्‍या स्टार्ट अप्सनी चांगली कामगिरी केली. त्यांना मोठा निधी मिळवता आला आणि त्याबरोबरच पारंपरिक स्पर्धकांच्या तुलनेत त्यांची अधिक झपाट्यानं वाढ झाल्याचं स्पष्ट झालं. पारंपरिक स्पर्धकांसाठी ते धोकादायक ठरतात का हे पुढील वर्षी स्पष्ट होईल. 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.