मुंबई

संघर्ष क्रीडा मंडळाने नव महाराष्ट्र संघाने मुंबई उपनगर कबड्डी असो.च्या मान्यतेने संस्थापक स्व. अशोक कदम यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या  आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरुषांत स्वस्तिक मंडळ, स्फूर्ती मंडळाने उपांत्य फेरी गाठली. गोराई येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या महिलांच्या उपांत्य सामन्यात गोरेगावच्या संघर्ष क्रीडा मंडळाने बोरिवलीच्या ओम नव महाराष्ट्र मंडळाला 39-17 असे सहज नमवित अंतिम फेरीत धडक दिली. 

सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत संघर्षने ओम नव महाराष्ट्रवर लोण चढवीत पूर्वार्धात 24-10 अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात आणखी एका लोणची नोंद करीत 22 गुणांच्या मोठ्या फरकाने सामना आपल्या नावे केला. संघर्षने पूर्वार्धात एक आणि उत्तरार्धात दोन अशा एकूण तीन अव्वल पकडीदेखील केल्या. भक्ती इंदुलकर, पूजा जाधव यांच्या भन्नाट खेळाला या विजयाचे श्रेय जाते.

पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या चुरशीच्या सामन्यात कुर्ल्याच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाने मध्यंतरातील पाच-सहा अशा पिछाडीवरून सह्याद्री क्रीडा मंडळाचा प्रतिकार 20-15 असा हाणून पाडला. मध्यंतरापर्यंत सावधपणे खेळला गेलेल्या या सामन्यात मध्यंतरानंतर मात्र चुरस पाहावयास मिळाली. यात स्वस्तिकने टॉप गिअर टाकत बाजी मारली. स्वस्तिकच्या सुयोग राजापकर, अस्लम शेख यांनी आपला खेळ गतिमान करीत सह्याद्रीवर एक लोण चढवीत सामना आपल्या बाजूने झुकविला. भरत, पार्थ यांचा खेळ सह्याद्री संघाचा पराभव टाळण्यास कमी पडला. दुसर्‍या उपांत्यपूर्व सामन्यात स्फूर्ती क्रीडा मंडळाने नवमहाराष्ट्र संघाचा 23-15 असा पाडाव करीत उपांत्य फेरी गाठली. अटीतटीच्या या सामन्यात केतन कळवणकर, राहुल मोरे यांनी उत्कृष्ट चढाई-पकडीचा खेळ करीत नव महाराष्ट्र संघाला नऊ-सात अशी आघाडी मिळवून दिली होती. पण, ती टिकवण्यात ते अपयशी ठरले. उत्तरार्धात स्फूर्तीच्या सुनील यादव, ऋषिकेश मोरे यांनी चढाई-पकडीचा आक्रमक खेळ करीत नव महाराष्ट्र संघावर लोण देत विजयश्री खेचून आणली.

 

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग