राजापूर 

तालुक्यातील शेजवली गावात जवळपास 15 दिवसांपूर्वी बिबट्यांची दोन बछडे ग्रामस्थ आणि मुलांनी पाहिलेली असताना पुन्हा एकदा दोन बछडे आढळून आली आहेत. या दोन्ही पिल्लांना वनविभागाने पिंजर्‍यात बंद करून सुरक्षितस्थळी सोडले आहे.

शेजवली परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्यांच्या बछड्यांचा वावर सुरू असताना शेजवली-वरचीवाडी येथील विजय गुणाजी परवडे यांच्या घरात बिबट्यांचा एक बछडा शिरला तर एक बछडा बाहेर होता. आराडाओरड झाल्यानंतर दोन्ही बछड्यांनी तेथून पळ काढला आणि प्रकाश महादेव मांजरे यांच्या मालकीचा गोठ्या असलेल्या लाकडाच्या माचाखाली जाऊन लपले. याबाबत शेजवली उपसरपंच मंदार राणे यांनी राजापूर वनविभागाला खबर दिली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी रात्री पिंजर्‍यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोन्ही बछड्यांना पिंजर्‍यात बंद करण्यात आले. याकामी वनविभागाचे विभागीय अधिकारी रमाकांत भवर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी वनक्षेत्रपाल प्रियांका लगड, राजापूर वनपाल एस.व्ही. घाटगे, वनरक्षक संजय रणधीर, सहकारी दीपक म्हादये, विजय म्हादये, दीपक चव्हाण आदींनी मोलाची भूमिका बजावली. बिबट्याच्या पिल्लांना पिंजर्‍यात बंद करण्यासाठी शेजवली उपसरंपच मंदार राणे, राजेंद्र देवळेकर, सुरेश परवडे, रामचंद्र देवळेकर आदी ग्रामस्थांनी वनविभागाला सहकार्य केले.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.