रत्नागिरी

नजीकच्या पांढरा समुद्र ते मिर्‍या येथे समुद्राचे आक्रमण थोपवण्यासाठी मिर्‍या ग्रामस्थांची कित्येक वर्षांची मजबूत धूपप्रतिबंधक बंधार्‍याची मागणी आहे. यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलनेही करण्यात आली आहेत. मात्र, या मागणीला अद्याप यश आलेले नाही. अखेर 26 जानेवारी रोजी पांढरा समुद्र ते मिर्‍या येथील सर्व ग्रामस्थांनी आक्रमक होत या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी तीन कि.मी.ची मानवी साखळी उभारणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबतचे निवेदन पांढरा समुद्र ते मिर्‍या सागरी धूपप्रतिबंधक बंधारा समिती, रत्नागिरीतर्फे जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे. तसेच या निवेदनाच्या प्रति उपविभागीय अधिकारी, शहर पोलीस ठाणे, पतन अभियंता मांडवी रत्नागिरी यांना देण्यात आले आहे. गतसाली 26 जानेवारी रोजी पांढरा समुद्र ते मिर्‍या परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले होते. या उपोषणाची दखल तत्कालीन पालकमंत्री यांनी घेऊन मंत्रालय स्तरावर अनेक बैठका घेतल्या. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत या उपोषणकर्त्यांची शिष्टाई करत मोलाचे सहकार्य केले व 3.5 कि.मी.च्या सागरी धूपप्रतिबंधक बंधार्‍यासाठी शासकीय मान्यता मिळवून दिली. परंतु, त्याबाबत संबंधित खात्याच्या सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांनी दखल न घेता अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

गेल्या मान्सूनमध्ये आणि झालेल्या अनेक वादळांमुळे किनार्‍यावर असलेला बंधारा पूर्णपणे तुटून गेला आहे. येणार्‍या मान्सूनमध्ये वादळी वारे व पावसाचा जोर झाल्यास मानवीवस्तीत समुद्राचे उधाणाचे पाणी भरण्याची शक्यता नाकारता येत नाही. संथगतीने चाललेले काम, गांभीर्याने विचार न झाल्यामुळे अखेर पांढरा समुद्र ते मिर्‍या येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. 

यावेळी मिर्‍या येथील ग्रामस्थ आप्पा वांदरकर, दिनेश रामकृष्ण सावंत, जयेंद्र दत्ताराम नार्वेकर, प्रमोद प्रभाकर नार्वेकर, दिगंबर बाळकृष्ण किर, दीपक लहू पाटील, तनया तुषार शिवलकर, दीपा दीपक मुरकर, स्वप्नील अनंत शिवलकर, ययाती रवींद्र शिवलकर, चंद्रशेखर अनंत पाटील आदी उपस्थित होते.

 

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग