राजापूर 

तालुक्यात विनापरवाना आणि बेकायदेशीररित्या होत असलेले चिरे (जांभा दगड) उत्खनन आणि त्याकडे महसूल प्रशासनाचे झालेले सोयीस्कर दुर्लक्ष ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता आणि मुक्या जनावरांच्या जीवावर बेतत आहे. उत्खनन केलेल्या चिरेखाणी बुजविण्याबाबत वा कुंपण घालण्याबाबत चिरेखाण व्यावसायिकांकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याने तालुक्यात अनेक भागातील चिरेखाणी मृत्यूचा सापळा बनल्या आहेत. त्यामुळे आता याविरोधात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची भेट  घेऊन त्यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्धार तालुक्यातील काही पर्यावरणप्रेमी जागरूक नागरिकांनी घेतला आहे.

राजापूर तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विनापरवाना आणि बेकायदेशीररित्या चिरे (जांभा दगड) उत्खनन होत आहे. या चिरेखाण सोयीस्कर दुर्लक्ष करणार्‍या राजापूर महसूल प्रशासनाने चिरेखाण व्यावसायिकांना परवानग्या देताना घातलेल्या नियम आणि अटींकडे काही चिरेखाण व्यावसायिकांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. मनाला वाट्टेल त्याप्रमाणे आणि कशाप्रकारे खोलवर अनेक व्यावसायिकांडून चिरे उत्खनन केले जात आहे. हे उत्खनन झाल्यानंतर कोणताही धोका निर्माण होऊ नये, ती चिरेखाण बुजविणे वा त्याच्या सभोवती योग्य प्रकारे कुंपण घालणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र या अटीचे कोणत्याही प्रकारे पालन होत नसल्याची बाब पुढे आली आहे. 

तालुक्यात अनेक भागात उघड्या चिरेखाणी असून, यामध्ये अनेक मुक्या जनावरांचा बळी जात आहे. तर काही ठिकाणी माणसांनाही धोका निर्माण होत आहे. अशाप्रकारे नियम आणि अटींचे कागदी घोडे नाचवून चिरेखाण व्यावसायिकांना छप्पर फाड के परवाने देणार्‍या महसूल प्रशासनाकडून अशा प्रकारे नियम आणि अटींच्या होणार्‍या उल्लंघनाकडेही दुर्लक्ष केले आहे. अशा प्रकारे नियम आणि अटी मोडल्याप्रकरणी आजपर्यंत एकाही चिरेखाण व्यावसायिकाविरोधात कारवाई झालेली नाही. महसूल प्रशासनाच्या या अभय देण्याच्या भूमिकेमुळे सर्वसामान्य जनता मात्र भरडली जात असून, चिरेखाण व्यावसायिकांची मनमानी वाढत आहे. 

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग