दिघी 

रोजगार निर्मितीसाठी पर्यटनाच्या जोडीला औद्योगिकरणाची भर पडत आहे. येथे  नेहमी पर्यटनाने गजबजलेल्या व सुविधापूर्ण शहरांची ओळख आहे. मात्र, पुणे - दिघी महामार्गालगत असणार्‍या म्हसळा तालुक्यातील मेंदडी आदिवासी वाडीला गेली दोन वर्षे शासनाच्या अनास्थेपायी पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. विकसित तालुका म्हणून ओळख पुढे येत असली तरी विकासापासून येथील नागरिक कोसो दूर आहेत.

दिघी - पुणे निर्मिती होत असलेल्या मार्गावर हे गाव आहे. एकीकडे झपाट्याने म्हसळा परिसरातील सुविधायुक्त शहरांची होत असलेली उभारणी बहुचर्चित आहे. या ठिकाणापासून म्हसळा - दिघी मार्गावर एक किलोमीटरच्या अंतरावर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या मेंदडी आदिवासी वाडीवर साधारण 80 कुटुंबातील 340 लोक राहातात. पाण्याची सुविधा सर्वत्र होत असतानाही मेंदडी आदिवासी वाडी वर अद्यापही पाणी आल नाही. परिणामी, येथील आदिवासी पाण्यासाठी मैलो - मैलोभर वणवण फिरत आहेत. त्यांच्या या मागणीकडे अद्यापपर्यंत फारसे कोणीही लक्ष दिले नाही. दरम्यान, आदिवासींसाठी सरकारने स्वतंत्र विभाग सुरू केला असताना प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत सरकारच्या काहीच सुविधा पोहचत नसल्याने नागरीकातून संताप व्यक्त केला जात आहे.

संपूर्ण महाराष्ट्रासह कोकणात दूरदृष्टी ठेऊन विविध विकास कामे करण्यात आली. तालुक्यातील दुर्गम भागातील गावे व वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी येथील प्रशासनाकडून लाखो रुपयांची योजना राबवण्यात आल्या. मात्र, या आदिवासीवाडी शेजारी एक किलोमीटर अंतरावर धरण असून या धरणाचे पाणी आदिवासी बांधवाना मिळत नाही. वेळोवेळी पाणी योजनेची मागणी होऊनसुद्धा येथील नागरिक पाण्यापासून तहानलेले आहेत.

येथील सार्वजनिक विहीर पूर्णपणे कोरडी असून स्वदेशफाउंडेशन मार्फत बांधण्यात आलेलं बोअरवेल बंद अवस्थेत आहे. दुसरी कोणतीच नळयोजना नसल्याने सद्या या गावात पाणी नाही. त्यामुळे ग्रामस्थ रानातील झर्‍यातून पाणी आणून पितात. अशाने येथील पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी दूर करणे प्रशासनाला आव्हानात्मक असून प्रशासनाच्या तत्परतेचा अभाव अशा क्षुल्लक कारणांमुळे मेंदडी आदिवासी वाडीवरील पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी सोडवण्याचे स्वप्न आजही अपूर्ण आहे.

- विहिर कोरडी आणि बोअरवेल बंद  

शासनाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार, औद्योगिक क्षेत्रातील कंपन्याचा सामाजिक दायित्व निधी (सीएसआर), कृषी विभागाच्या योजना राबविल्या जातात. मात्र, अशा योजनाचा फारसा फरक तालुक्यातील गावांना पडला नाही. तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात जल संधारण तसेच जल संवर्धन सारख्या कायम व दूरदृष्टी उपायांची गरज आहे. प्रशासन बोअरवेल व विंधन विहिरी प्रस्तावित करण्याचे कागद घोडे नाचवते. कधी कधी विंधन विहिरीस पाणी न लागल्याने खर्च ही वाया जातो. हे चित्र सद्या मेंदडी आदिवासी वाडीवर दिसत आहे.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली