मुंबई 

नव महाराष्ट्र मंडळाने मुंबई उपनगर कबड्डी असो.च्या मान्यतेने आयोजित केलेल्या प्रथम श्रेणी पुरुषांत नव महाराष्ट्र, प्रशांत मंडळ, जॉली स्पोर्ट्स, अभिनव मंडळ यांनी विजयी सलामी दिली. गोराई- बोरीवली येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू झालेल्या प्रथम श्रेणी पुरुषांच्या सामन्यात नव महाराष्ट्र संघाने ओम साई मंडळाचे आव्हान 22-13 असे संपविले. केतन कळवणकर, मंदार दळवी यांच्या आक्रमक सुरुवातीच्या जोरावर नव महाराष्ट्राने विश्रांतीलाच 14-07अशी आश्‍वासक आघाडी घेतली होती. विश्रांतीनंतर सावध खेळ करीत हा विजय साकारला. ओमकार संधाने, प्रथमेश मांजरेकर ओम साईकडून बरे खेळले.

  प्रशांत क्रीडा मंडळाने संकेत मडदे, तनय पालकर यांच्या चतुरस्त्र खेळाच्या बळावर युवा मंडळाला 39-22 असे नमवित आगेकूच केली. सौरभ पाल, संदीप गावडे यांनी युवाकडून बर्‍यापैकी प्रतिकार केला. अभिनव मंडळाने शितलादेवी मंडळाचा 35-19 असा पराभव केला. अनिकेत हांडे, अभिषेक कडव अभिनवकडून, तर कुणाला दोरगे, सुमित वाघ शितलादेवीकडून उत्तम खेळले. जॉली स्पोर्टसने संघर्ष मंडळाला 27-20 असे नमविलें. मध्यांतराला 14-09 अशी आघाडी घेणार्‍या जॉलीला उत्तरार्धात संघर्षने कडवी लढत दिली.  नामदेव इस्वलकर, अनिकेत पाडलेकर यांच्या दमदार खेळाला या विजयाचे श्रेय जाते. संमेश पगड, विशाल धावडे यांनी उत्तरार्धात कडवी लढत दिली. 

  महिलांच्या उदघाटनिय सामन्यात संघर्ष क्रीडा मंडळाने तेजस्वीनी क्रीडा मंडळाला 37-10 असे लीलया पराभूत केले. प्रणाली नागदेवता, पूजा जाधव यांच्या उत्कृष्ट खेळाला या विजयाचे श्रेय जाते. तेजस्वीनीची मिताली कदम एकाकी लढली. या स्पर्धेचे उदघाटन स्थानिक आमदार सुनील दत्तात्रय राणे, नगरसेवक शिवानंद शेट्टी,  बोरीवली मंडळाचे अध्यक्ष अमर मेहता यांच्या उपस्थितीत पार पडला.

 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली