ऑस्ट्रेलियातल्या जंगलांमध्ये लागलेल्या वणव्यांमध्ये कोट्यवधी पशु-पक्षी मरण पावले आहेत. या आगीमुळे ऑस्ट्रेलियातल्या तापमानातही कमालीची वाढ झाली. यामुळे आत्तापर्यंत सुमारे नऊ जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, अशी आग यंदा प्रथमच लागलेली नाही. तापमानवाढीमुळे आणि प्रदूषणामुळे आगीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. जगभर चिंतेचा विषय ठरत असलेल्या ऑस्ट्रेलियातल्या आगीविषयी...

 

ऑस्ट्रेलियात सिडनीतल्या जंगलांमध्ये अनेक ठिकाणी डिसेंबरमध्ये प्रचंड आग लागली. या वणव्यांमध्ये अनेक वनस्पती, वृक्ष जळून खाक झालेच, पण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावू-उडू न शकणारे कोट्यवधी पशु-पक्षीही जळून मेले. या वणव्यांनी एवढा धुमाकूळ घातला, की स्वतःला अत्याधुनिक, सर्वशक्तीमान समजणार्‍या लोकांनी चक्क प्रार्थनेचा मार्ग स्वीकारला आणि त्यानंतर जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. या वणव्यांचा धसका घेतलेल्या आणि झळा सोसलेल्या प्राण्यांनीही माणसांबरोबरच पावसाचा आनंद साजरा केला. कांगारुंनी पाऊस पडल्यावर केलेलं नृत्य हा जगभरात कुतूहलाचा विषय ठरला. मात्र, त्या आधी सामान्यांच्या तोंडचं पाणी पळवणार्‍या आगीने अवघ्या जगाला स्तिमीत केलं. न्यू साऊथ वेल्स रुरल फायर सर्व्हिसेसनं ही अलीकडच्या अनेक वर्षांमधली आपत्तीजनक आग असल्याचं स्पष्ट केलं असून, ऑस्ट्रलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी या संकटाचा सामना करण्यासाठी तीन हजार राखीव सैनिकांना तैनात केलं आहे. या आगीची भयानकता एवढी मोठी आहे, की आतापर्यंत लाखो झाडंझुडपं आणि तब्बल 50 कोटी प्राणी त्यामध्ये जळून खाक झाले आहेत.

गेल्या वर्षी पश्‍चिम सिडनी परिसरातलं तापमान 47 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलं. यातच जोरदार वारे वाहात राहिले. त्यामुळे आग लागलेल्या ठिकाणी वणवे भडकले. न्यू साऊथ वेल्समध्ये आणीबाणीची परिस्थिती जाहीर करण्यात आली. तिथे तब्बल 100 वणवे भडकले होते. ते विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे तब्बल दोन हजार जवान रात्रंदिवस प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. या परिसरातली 15 घरं नष्ट झाल्याचं अधिकृत आकडेवारी सांगते. वास्तविक, दक्षिणायनाच्या दरम्यान ऑस्ट्रेलियात दरवर्षीच असे वणवे भडकतात. परंतु, यंदा ते नेहमीपेक्षा खूपच लवकर, म्हणजे 2019 च्या ऑगस्टपासून सुरू झाले आणि अद्याप आटोक्यात आलेले नाहीत. तिथे हिवाळ्यातही कोरडी आणि उष्ण हवा होती. नेहमीच्या थंड हिवाळ्यांच्या तुलनेत ही बाब लोकांना विचित्र वाटली होती. ऑस्ट्रेलियातली सुमारे 30 लाख हेक्टर जमीन या आगीत भस्मसात झाली असून, नऊजणांचा मृत्यू झाला आहे. 7 जानेवारी 2020 पर्यंत आगीत भस्मसात झालेल्या घरांची संख्या 1,588 होती. 653 घरांची नासधूस झाली होती. 3,122 मोठ्या इमारती नष्ट झाल्या होत्या.

1851 पासून या वणव्यांची मोठी दखल घेतली गेली असून, तेव्हापासून आजतागायत सुमारे 800 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याबरोबरच कोट्यवधी वन्यजीव जळून खाक झाले आहेत. हजारो वर्षांपासून ऑस्ट्रेलियातले लोक गवताळ प्रदेश नष्ट करून शिकार करण्यासाठी आणि नंतरच्या काळात वाहतुकीचे मार्ग तयार करण्यासाठी जंगलांना आग लावत आले. मात्र, या गोष्टी वाळवंटी प्रदेशाभोवतीच्या अत्यंत लहान गवताळ प्रदेशांमध्ये आणि मुसळधार पावसाच्या मोसमातल्या कोरड्या दिवशी पार पाडल्या जात असत. त्यामुळे वन्य जीवांना किंवा माणसांना आगीचे चटके सोसावे लागत नव्हते. ़शिवाय यानंतर उगवणार्‍या पिकांच्या प्रजातींमध्ये प्रथिनांचं प्रमाणही अधिक असतं, असा या लोकांचा विश्‍वास होता. त्यामुळे तेवढ्याच उद्देशानं या आगींचा वापर केला जात होता. अलीकडच्या काळात 2006 पासून प्रचंड हानी घडवून आणणार्‍या नैसर्गिक आगींचं प्रमाण सातत्यानं वाढत आहे. 2009 मध्ये आग्नेय ऑस्ट्रेलियातल्या उष्णतेच्या लाटांमध्ये 180 लोक मरण पावले होते. त्याआधी 1815 मध्येही अशीच मोठी हानी झाली होती. तो दिवस ब्लॅक थर्स्डे म्हणून ओळखला जातो. मात्र, 2006 च्या तुलनेत ही हानी अल्प मानली जावी इतकी अलीकडची हानी भयावह आहे.

या आगींमुळे प्राणी थेट मरतात आणि स्थानिक अधिवास नष्ट झाल्यामुळे बेडकांसारखे जिवंत राहिलेले प्राणी आणि जमिनीवर राहणारे पाश्‍चात्य पोपट आणि जास्त उंचावरून उडू न शकणारे पक्षीही इतर प्राण्यांच्या सहज भक्ष्यस्थानी पडून पुन्हा नष्ट होतात. शिवाय आधीच नामशेष होत चाललेले प्राणी लवकर नामशेष होतात. कोआल या छोट्या अस्वलाप्रमाणे दिसणार्‍या आणि झाडांवर चढू शकणार्‍या ऑस्ट्रेलियन प्राण्यांना या आगीची मोठी झळ बसते. कारण आग लागली की ते झाडांवर चढतात आणि तिथेच आपल्या शरीराची चेंडूसारखी गुंडाळी करून घेतात; परिणामी आगीत सापडतात. कांगारूही इतर प्राण्यांच्या तुलनेत आगीतून लवकर निसटतात. स्वतःला पुरून घेणारे किंवा उंच उडू शकणारे प्राणी या आगीतून मोठ्या प्रमाणात वाचतात. यात पृष्ठभागांवर फिरणार्‍या पालींचा, सरड्यांचा आणि सापांचाही समावेश होतो. शिवाय गरुडासारखे काही पक्षी जळत्या फांद्या एका ठिकाणाहून उचलून दुसरीकडे टाकतानाही आढळतात. त्यामुळे आगी आणखी भडकतात. आगीच्या कारणांमध्ये वीज कोसळण्यासारख्या नैसर्गिक कारणांचा समावेश असला तरी यात मनुष्यनिर्मित कारणांचाही मोठा हात असल्याचं वारंवार स्पष्ट झालं आहे. विजेच्या तारा, जाळपोळ, नैसर्गिक ठिकाणी गेल्यानंतर धूम्रपान करून जळत्या सिगरेट फेकणं ही यातली प्रमुख कारणं आहेत.

या देशातल्या कोरड्या हवामानामुळेही या आगीत तेल ओतलं जातं आणि वणवे भडकतात. 2019 मध्ये 20 वेळा लागलेल्या आगींना उष्ण आणि कोरडं हवामान कारणीभूत होतं आणि अधिकाधिक उष्णता वाढण्याला वाढतं प्रदूषण कारणीभूत होतं. ऑस्ट्रेलियाचं तापमान गेल्या शतकात एक अंश सेल्सिअसहून अधिक प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे तिथे वारंवार उष्णतेच्या लाटा निर्माण होत असून, दुष्काळ पडत आहेत. 2005  ते 2019 दरम्यानची दहा वर्षं सर्वोच्च तापमानाची होती. मेलबर्न युनिव्हर्सिटीत करण्यात आलेल्या 2018 च्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे, की विसाव्या शतकात उशीरापासून ते एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत दक्षिण ऑस्ट्रेलियात गेल्या 400 वर्षांचा विचार करता अभूतपूर्व दुष्काळ पडले. देशभर सर्वत्र सरासरी तापमानात विक्रमी वाढ झाली. यात 2019 चा उन्हाळा सर्वाधिक उष्ण होता. उष्णतेच्या लाटा आणि दुष्काळ यामुळे जमिनीच्या पोटातला भाग कोरडा पडतो. त्यामुळे आग लागण्याचा धोका वाढतो. गेल्या तीस वर्षांमध्ये हा धोका कमालीचा वाढला आहे. 1990 च्या मध्यापासून ऑस्ट्रेलियात शरद ऋतूमध्ये आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला पडणार्‍या पावसात 15 टक्के तर एप्रिल-मेमध्ये पडणार्‍या पावसात 25 टक्के घट झाली आहे. जानेवारीपासून ऑगस्टपर्यंत पडणारा पाऊस 2019 मध्ये सर्वाधिक कमी होता. क्वीन्सलंड आणि न्यू साऊथ वेल्स या भागातल्या काही परिसरात तर दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत तब्बल 77 टक्के कमी पाऊस पडला.

सुमारे दहा वर्षांपूर्वी इंटरगव्हर्न्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजने (आयपीसीसीने) असा निष्कर्ष काढला होता, की हवामानात होणार्‍या सातत्यपूर्ण बदलांमुळे ऑस्ट्रेलियात आगींची वारंवारता आणि तीव्रता सातत्याने वाढत जाईल. ऑस्ट्रेलियन क्लायमेट कौन्सिलनं 2019 च्या नोव्हेंबरमध्ये ङ्गधिस इज नॉट नॉर्मलफ या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यात क्वीन्सलँड आणि एनएसडब्ल्यू या परिसरात अनिष्टकारी आग भडकावणारी परिस्थिती दिवसेंदिवस भयानक बनत चालल्याचं म्हटलं आहे. बुशफायर सीआरसी, 2006 च्या अहवालानुसार ऑस्ट्रेलियातल्या बर्‍याचशा वनस्पती आणि झाडं ही गुंतागुंतीच्या उत्क्रांतीच्या अवस्थांमधून निर्माण झालेली असल्यानं अनेक झाडांच्या बिया आगीतही सुरक्षित राहतात. काही आधीच जमिनीत गाडल्या गेलेल्या असतात आणि आग संपल्यानंतर पुन्हा झाडं तयार होतात. परंतु अलीकडे आगीची वारंवारता वाढल्यानं दोन आगींमध्ये पुरेसा मोकळा वेळ मिळेनासा झाला आहे. म्हणूनच या आगींनी पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होत चालला आहे.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली