दिनांक 18 जानेवारी 2020 

इतर दिनविशेष :

* 1842 - राजकारणी, समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व द्रष्टे  न्या. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म.

* 1919 - पहिल्या महायुद्धानंतर पॅरिस येथे शांतता परिषद सुरु.

* 1944 - भारतीय ज्ञानपीठाची स्थापना.

* 1956 - संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या आंदोलनाच्या वेळी मुंबईत झालेल्या गोळीबारात 10 ठार, 250 जखमी.

* 1983 - बँक ऑफ महाराष्ट्राच्या स्थापनेचे प्रेरक पुण्यात मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक आ.रा. भट यांचे निधन.

 

 

लग्नाच्या मुहूर्ताची वेळ झाली तरी नवर्‍या मुलाचा पत्ता नव्हताच. पळाला..... पळाला. 14 वर्षांचा पांडुरंग देशासाठी भर मंडपातून पळाला. स्वातंत्र्यलढ्यात त्याने भाग घेऊ नये म्हणूनच त्याच्या वडिलांनी त्याच्या लाचा घाट घातला होता. तो त्याने उधळला. डॉ. खानखोजे यांचा जन्म 7 नोव्हेंबर, 1884 सोजी वर्धा जिल्ह्यातील पालकवाडी येथे झाला. त्यांचे मूळचे आडनाव देशपांडे. नागपूरच्या भोसल्यांच्या राज्यात हिंदूंना बाटवून मुसलमान करणार्‍या एका खानाची खोड त्यांच्या आजोबांनी मोडली. तेव्हापासून त्यांना खानखोजे याच नावाने ओळखू लागले. प्राथमिक शिक्षणाचे धडे त्यांनी वर्ध्यात गिरवले. वीर सावरकरांच्या ‘मित्रमेळाव्या’ प्रमाणेच त्यांनी ‘बाल समाज’ नावाचे एक मंडळ काढले. सशस्त्र क्रांतीचे विचार त्यांच्या मनात घोळत होते. शस्त्रारोबर शास्त्राचेही उपजत गुण त्यांच्यापाशी होते.

लोकमान्य टिळकांच्या सल्ल्यानुसार शस्त्रविद्या शिकण्यासाठी त्यांनी अमेरिकेला जायचे ठरवले. एका बोटीवर मजूर कामगार म्हणून ते प्रथम जपानला गेले. तेथून अमेरिकेला पोहोचल्यावर लाला हरदयालांच्या ‘गदर’ या संघटनेत सक्रिय सहभागी झाले. त्याचबरोबर अमेरिकेच्या लष्करी शाळेतही दाखल झाले.

परंतु, अमेरिकेत नागरिकत्व नसल्याने पुढचे लष्करी शिक्षण त्यांना मिळाले नाही. तेव्हा कृषी शास्त्रात बीएससीची पदवी घेतली. इंग्रजांशी टक्कर देण्याकरिता गनिमी युद्धाचे तंत्र शिकवण्यासाठी ते मेक्सिकोला गेले. याच सुमारास महायुद्ध भडकले. तेव्हा खानखोजे यांनी संधीचा फायदा घ्यायचे ठरविले. ‘महंमदखान’ हे नाव धारण करून त्यांनी इराण गाठले. इराणच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन इंग्रजांविरूद्ध युद्ध खेळले. जखमी अवस्थेत ब्रिटिशांनी त्यांना पकडले. पण, शिताफीने ते तेथून निसटले. शेकडो मैल तीन दिवस उपाशीपोटी ते चालत होते. तेव्हा निराशा येऊन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. कसेबसे एका इराकी गावात पोहोचल्यावर एका इराकी सरदाराच्या मदतीने त्यांनी इंग्लंड गाठले. तेथून परत आपल्या मातृभूमीत आले. मुंबईत आल्यावर टिळकांना भेटले. तथापि, आता जर तुम्ही ब्रिटिशांच्या हाती सापडलात, तर फासावर लटकाल. तेव्हा येथून सटका, असे टिळकांनी सांगितले. तेव्हा पुन्हा इराणमार्गे युरोपला पोहोचले. तेथून स्वामी सत्यदेव यांच्या मदतीने मेक्सिकोला गेले. मेक्सिकोत त्यांनी शेतीवर प्रयोग करून त्या देशात कृषी क्रांती घडवली. मेक्सिकोत सरकारने त्यांना नागरिकत्व बहाल करुन आपल्या देशात कृषी सल्लागार म्हणून नेमले.

मेक्सिकोत त्यांच्या वैयक्तिक इतिहासाला कलाटणी मिळाली. ‘जेनी’ नावाच्या स्त्रीबरोबर त्यांनी विवाह केला. जेनी विवाहानंतर हिंदू जीवन पद्धती जगली व तिचे जानकीत रुपांतर झाले. तथापि, त्यांची मातृभूमीची ओढ दिवसेंदिवस तीव्र होत चाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपली सर्व संपत्ती विकून ते हिंदुस्थानात आले. पंडित नेहरुंनी त्यांचे स्वागत केले. कृषी सल्लागार म्हणून त्यांची नेमणूकही झाली; परंतु ती काही काळाकरिताच.

त्यानंतर ते चक्क बेकार झाले. त्यांना नोकरी नव्हती. नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुंनी त्यांना वसतिगृहाचे वॉर्डन म्हणून 250 रु. महिना या पगारावर नेमले! आंतरराष्ट्रीय  कीर्तीचे क्रांतिकारक, शास्त्रज्ञ, मेक्सिकोत महिना 2500 हजार डॉलर्स पगार असलेले डॉ. खानखोजे यांना मायदेशासाठी केलेल्या कार्याची ही किंमत! ज्यांनी मातृभूमीच्या बेड्या तोडण्यासाठी घराकडे दुर्लक्ष केले. आई, वडील केव्हाच जग सोडून गेले तेही त्या काळात त्यांना उशिरा समजले. घरातून पळाल्यावर त्यांच्या आईने हाय खाऊन हे जग सोडले. वडीलही आपला मुलगा इंग्रजांच्या ताब्यात सापडला तर फासावर लटकेल या चिंतेने गेले. त्या खानखोज्यांनी आईवडिलांचे दर्शन घेतले नाही व अंत्यदर्शनही घेता आले नाही. स्वातंत्र्यकाळातही पारतंत्र्याचे जीवन जगणारे, कृषी आणि क्रांतीचा अद्भूत संगम साधणारे डॉ. खानखोजे 18 जानेवारी, 1967 रोजी हा देश व जगही कायमचे सोडूल गेले.

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग