संक्रांतीच्या सणात सुगडं पुजणं, बोराचं वाण देणं, विस्तवावर दूध उतू घालवणं या आणि अशा पारंपरिक प्रथा आज फारशा दिसत नसल्या, तरी घरोघरच्या स्त्रिया एकमेकींना हळद-कुंकू लावून तिळाचे लाडू देतात. हा आनंदोत्सव रथसप्तमीपर्यंत रंगतो. स्नेहाचं प्रतीक म्हणून एकमेकांना तिळगूळ देतात. एकमेकांमधले हेवे-दावे विसरुन जाण्याचा हा दिवस. आजच्या संघर्षमय जीवनात अशा सणाचं महत्त्व जपणं अधिक समर्पक ठरतं.

मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात नववर्षाचं स्वागत केलं जातं. नव्या उमेदीनं सारे कामाला लागतात. या नव्या वर्षात काही नवे संकल्प निश्‍चित केलेले असतात आणि त्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरू होतात. वातावरणात गारठा वाढलेला असतो. पहाटेच्या धुक्यानं जणू दुलई पांघरलेली असते. अशा या गारठ्यात उत्साही मंडळी फिरायला बाहेर पडतात. कुठे नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं भटकंतीचे बेत आखले जातात. शेतात पीकं तरारून वर आलेली असतात. त्यांचं डोलणं पाहण्याजोगं असतं. पाखरांचे थवे शेतांवर घिरट्या घालू लागतात. पिकांच्या राखणीसाठी  शेतकर्‍यांची लगबग सुरू असते. अशातच शेत-शिवारात हुरडा पार्ट्या रंगू लागतात. सायंकाळी मावळतीकडे झुकलेला सूर्य, त्याचा तो तांबूस प्रकाश, वातावरणात दाटलेला गारठा आणि शेतातल्या मोकळ्या वातावरणात गरमागरम हुरड्याची मेजवानी. याचा आनंद काय वर्णावा? हुरडाच नव्हे तर त्याच्या जोडीला ओला हरभरा, ऊस, बोरं यांची मेजवानी असतेच. कारण, या काळात निसर्गानं या बाबींचं भरभरून दान दिलेलं असतं. त्यांचा आस्वाद घेण्यासाठी सारे सज्ज असतात.अशा या भारलेल्या, तन-मनाला प्रसन्नता प्राप्त करून देणार्‍या, उल्हासित वातावरणात वेध लागतात मकरसंक्रांतीचे. नव्या वर्षातला हा तसा पहिला सण. साहजिक तो साजरा करण्यातला उत्साह काही वेगळाच असतो. नात्या-नात्यांमधली गोडी अबाधित राहावी, किंबहुना वाढावी, इतरांप्रती स्नेह वृद्धिंगत व्हावा हा या सणाचा मुख्य उद्देश.     

खरं तर आपल्या संस्कृतीतल्या विविध सणांमधून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. निसर्गाच्या आपल्यावर असणार्‍या ऋणाची जाणीव ठेवून त्याच्या रक्षणाप्रती कटिबद्ध राहण्याची जणू शिकवण दिली जाते. कारण, निसर्ग आणि मानवाचं नातंच असं अतूट आहे. निसर्ग आपल्याला वेळावेळी भरभरून देत असतो आणि त्याद्वारे आपल्या आयुष्यात सुखाचे-समाधानाचे रंग भरले जातात. मकर संक्रांतीच्या निमित्तानेही एक प्रकारची निसर्गपूजाच केली जाते. संक्रांतीपूर्वी येणार्‍या मार्गशीर्ष महिन्यातल्या वेळी अमावस्येच्या दिवशी शेतकरी कुटुंबियांसह शेतात जाऊन पिकांची मनोभावे पूजा करतात. या काळ्या आईला नैवेद्य दाखवला जातो. सारे कुटुंबीय, स्नेही मिळून शेतात जेवण करतात. या पूजेनंतर शेतात पिकांच्या काढणीला सुरुवात होते. ही प्रथाही इथे लक्षात घेण्यासारखी आहे. थंडीत उष्ण पदार्थांचं सेवन लाभदायी ठरतं. त्या दृष्टीने तीळ आणि गुळ हे दोन्हीही उष्ण गुणधर्माचे आहेत. शिवाय, या दोन्हींमध्ये आरोग्यदायी घटक असतात. त्यामुळेच संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने तिळ-गुळाचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. या दिवसात शेतात ऊस, ज्वारी, बोरं, गहू ही पिकं काढणीला आलेली असतात. त्यामुळे संक्रांतीनिमित्त केेल्या जाणार्‍या वाणात या बाबींचा समावेश करण्याची प्रथा सुरू झाली असावी, असं म्हणता येतं.   

‘तिळगुळ घ्या, गोड बोला’ हा संक्रांतीचा मुख्य संदेश. एकमेकांना तिळगुळ देतानाच मनामनातही एकमेकांप्रती स्नेहभाव वाढावा, असाही हेतू यामागे आहे. आणखी एक बाब म्हणजे याच काळात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि पृथ्वी परिभ्रमणाची आपली दिशा बदलते. लांबलेल्या रात्री उत्तरोत्तर लहान होत जातात. दिवस मोठा होऊ लागतो. सूर्याचा मकर राशीत होणारा प्रवेश ही महत्त्वपूर्ण घटना लक्षात घेऊन आपण हा दिवस उत्साहात साजरा करतो. सुगडं पुजणं, एकमेकींना बोराचं वाण देणं, विस्तवावर दूध उतू घालवणं या आणि अशा पारंपरिक प्रथा आज फारशा दिसत नसल्या तरी घरोघरच्या स्त्रिया एकमेकींना हळद-कुंकू लावून तिळाचे लाडू देतात. पुढे रथसप्तमीपर्यंत हा आनंदोत्सव रंगत राहतो. स्नेहाचे प्रतीक म्हणून सगळे एकमेकांना तिळगूळ देतात. एकमेकांमधले हेवेदावे विसरून जाण्याचा हा दिवस. आजच्या संघर्षमय जीवनात अशा सणाचं महत्त्व जपणं अधिक समर्पक ठरतं. 

संक्रांतीनंतर पतंग उडवण्याच्या महोत्सवाची सुरुवात होते. मोकळ्या-ढाकळ्या वातावरणात, आकाशाच्या छपराखाली उभं राहून तासनतास पतंग उडवण्याची कल्पना तरी किती छान! थंडीच्या सरत्या दिवसात सूर्याखाली उभं राहून पतंग उडवायचा! लाल, निळे, पिवळे, हिरवे... रंगीबेरंगी, लहान-मोठे पतंग आकाशात उडत असतात. कुणाचे पतंग झरझर वर चढतात. कुणाचे पतंग आकाशात झेप घेता-घेता झपकन खाली येतात. कुशल हातांनी आपल्या पतंगाला कधी ढील देत, कधी खेचत दिशा देता येते. कुणी दुसर्‍याचे पतंग कापून काढतो. एकच ओरडा होतो. खरं म्हणजे आपल्या पतंगाची दोरी आपल्याच हातात असते. ज्याची दोरीवरची पकड मजबूत तोच दुसर्‍याचे पतंग काटतो. एकाची जीत-दुसर्‍याची हार, असं हे चित्र.  

संक्रांतीसंदर्भात आणखीही काही बाबी लक्षात घ्यायला हव्यात. मुख्यत्वे या सणांच्या निमित्तानं माणसाच्या सामाजिक संपर्कप्रियतेचे आविष्कार पूर्वीपासून होत आले आहेत. स्त्री वर्गानं घरोघर योजलेले हळदी-कुंकू समारंभ हासुद्धा सामाजिक अभिसरणाचाच एक प्रकार आहे. हे कार्यक्रम समाजात रुढ झाले त्यामागेही अभिसरणाचीच भावना अभिप्रेत नाही का? मानवजातीतल्या थोर विचारवंतांनी विश्‍वकल्याणाची अनेक सूत्रं साध्यासुध्या धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक व्यवहारातून सामान्य माणसांपर्यंत आणून पोहोचवली. आज शिक्षणाच्या प्रसाराबरोबर सर्व जुने-नवे विचार समजून घेण्याचा आपला आवाका वाढला आहे. आपण त्याचा डोळस उपयोग केला पाहिजे. जग प्रकाशपूजक आहे. वनस्पती अंधारात ठेवली तरी मिळेल त्या झरोक्यातून उजेडाचा शोध घेत जाते असं आपण पाहतो. जगाच्या चैतन्याचं मूळ प्रकाशातच आहे. प्रकाश आहे म्हणून दृष्टी आहे आणि दृष्टी आहे म्हणून सृष्टी आहे, हा तर आपल्या सर्वांचा अनुभव. सृष्टीच्या प्रत्येक घटकाला प्रकाशाची ओढ आहे. अंधारदेखील आपल्याला हवा असतो, पण तात्पुरताच, कायमचा नव्हे! प्रकाशासाठी आपण आतुर असतो, त्याच्या अभावी बेचैन होतो. रात्र संपणार आणि दिवस उजाडणार या भरवशावर आपण निर्धास्त असतो. 

सृष्टीतल्या प्रकाशाचा मूळ स्त्रोत म्हणजेे सूर्य. चर आणि स्थिर अशा संपूर्ण सृष्टीचा आत्मा सूर्यच आहे! सृष्टीच्या सृजन-पालन-पोषणाची जबाबदारी तो नेमकेपणे सांभाळत आहे तोवर ठीक आहे. सूर्याचा अंतरिक्षातला प्रवास, सूर्याभोवती फिरणार्‍या पृथ्वीसारख्या ग्रहगोलांचा प्रवास आणि आणि सूर्यापेक्षा अनेक पटींनी मोठे असलेल्या असंख्य वार्‍यांचा प्रवास यांची एक प्रचंड यंत्रणा अंतरिक्षात सुरु आहे आणि तिचं एक सर्वसमावेशक वेळापत्रक आहे. त्यातलं अगदी थोडंसं वैज्ञानिकांना कळलं आहे आणि अजून किती तरी कळायचंच आहे. 

या पार्श्‍वभूमीवर सूर्य एका राशीतून दुसर्‍या राशीत जातो या घटनेला म्हणायचं संक्रमण! ज्या दिवशी किंवा नेमक्या ज्या वेळेला हे संक्रमण घडतं त्याला आपण संक्रांती म्हणतो. बोलीभाषेत ‘संक्रांत’ म्हटलं जातं. संक्रांत म्हणजे सूर्याचं राश्यंतर. सुदैवानं आपण अशा प्रदेशात राहात आहोत जिथे दिनमान आणि रात्रिमान यामध्ये सुमारे तासाभरापेक्षा जास्त फरक पडत नाही. म्हणजे अगदी छोटासा दिवस आणि प्रदीर्घ रात्र असं आपल्याकडे कधीच घडत नाही! पण, खूप उत्तरेला किंवा खूप दक्षिणेला जावं तसा हा फरक वाढत जातो आणि शेवटी ध्रुव प्रदेशात, तर सहा महिन्यांची रात्र आणि सहा महिन्यांचा (तोही सौम्यसा) दिवस अशी स्थिती होते. ती सहा महिन्यांची रात्र माणसाचा अंत पाहात असेल तेव्हा तो दिवसाच्या दर्शनाला किती अधीर होत असेल याची कल्पना करुन पाहावी. 

इतिहासाचे अभ्यासक सांगतात, की हजारो वर्षांपूर्वी आर्यलोक ध्रुवावर राहात होते. त्यांचा वर्षातला बराच काळ दिवसासाठी उत्कंठित झालेल्या अवस्थेत जात असे! हे खरं असेल तर दक्षिणेकडे गेलेला आपला चैतन्यदाता सूर्य पुन्हा उत्तरेकडे यायला वळतो तो दिवस मोठा भाग्याचा समजून त्यांनी सण म्हणून साजरा केला असेल तर आश्‍चर्य वाटण्यासारखं काही नाही. उत्साहाची देवाणघेवाण हे तर सर्वच सण-समारंभांचं रहस्य आहे. संक्रातीच्या सणाचा विचार करायचा तर सुगड देऊन, जेवायला घालून मिळणार्‍या पुण्याबरोबरही आनंदच मिळतो आणि तिळगूळ देऊन-घेऊन एकमेकांशी गोड बोलण्यातही आनंदच मिळतो. एकंदर हा सण म्हणजे आनंदाची उधळण असते, हे क्षण मनाच्या कुपीत जपून ठेवावेत असे असतात. त्यातून दर वर्षी संक्रांतीच्या सणाची गोडी वाढत जाते.

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग